नवी दिल्ली : आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे खूप वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर भारताची इतिहास रचणारी जिम्नॅस्ट दीपा करमारकर हिने यावर्षी रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही, असे सांगितले.आॅलिम्पिक क्वालिफाइंग स्पर्धेद्वारे रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारी दीपा पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट बनली. येथे पोहोचल्यानंतर तिचे जंगी स्वागत करण्यात आले.दीपा करमारकर म्हणाली की, ‘जेव्हापासून मी जिम्नॅस्टिक सुरू केले आहे तेव्हापासून आॅलिम्पिक खेळण्याची माझी इच्छा होती. एक दिवस आॅलिम्पिकमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करू, असे मी स्वप्न पाहिले होते. मी आॅलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. मी आता आधीच्या तुलनेत जास्त मेहनत करीन आणि रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकील, अशी आशा आहे. इतिहास रचत जाण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन आणि हेच माझे लक्ष्य आहे.’आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या मेहनतीविषयी ती म्हणाली की, ‘मी गेल्यावर्षी विश्व चॅम्पियनशिपद्वारे आॅलिम्पिकसाठी पात्र ठरू इच्छित होती; परंतु असे होऊ शकले नाही. त्यानंतर मी रिओ टेस्ट इव्हेंटला आपले लक्ष्य बनवले आणि हे लक्ष्य प्राप्त केल्याने मी आनंदित आहे.’स्तुतिसुमनांची उधळण होत असतानाही दीपा करमारकर स्वत:ला स्टार समजत नाही. ती म्हणाली की, ‘मी कोणती स्टार नाही. मी अशा प्रकारचा विचार करीत नाही. माझे काम मेहनत करणे हे आहे. आॅलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणे हे माझे लक्ष्य आहे.’आॅलिम्पिकच्या तयारीसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणद्वारे उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांविषयी ती म्हणाली की, येथे पायाभूत सुविधा चांगल्या आहेत, असे मला वाटते. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये फोमची पिट आहे आणि साईने दोन दिवसांत नवीन स्प्रिंगबोर्ड लावून देण्याचे वचन दिले आहे. आता माझे पूर्ण लक्ष सरावावर केंद्रित आहे.’तिने आपले आॅलिम्पिक क्वॉलिफिकेशन प्रशिक्षक बिशेश्वर नंदी यांना समर्पित केले.नंदी हे तिचे १६ वर्षांपासून प्रशिक्षक आहेत. ती म्हणाली की, ‘ही खूप कठीण बाब होती; परंतु माझ्याकडे त्यांच्यासारखा महान मेंटर होता ज्यामुळे मी येथे आहे. जर ते नसते तर मला येथे कोणी ओळखले नसते. मी माझी उपलब्धी त्यांना समर्पित करते.’ दीपाने तिची अद्याप सर्वोत्तम कामगिरी केली नाही आणि परफेक्शनची इच्छा तिची कामगिरी उंचावेल. ती जिद्दी आहे. जे ठरवले ते करून दाखवते. तिची सर्वोत्तम कामगिरी बाकी आहे आणि ती रियोत यापेक्षा चांगली कामगिरी करू शकते, असे नंदी यांनी सांगितले.
आॅलिम्पिक पदकासाठी कठोर मेहनत घेणार : दीपा
By admin | Published: April 22, 2016 2:33 AM