दोहा : दीपक कुमार याने १४ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक जिंकून पुढील वर्षीच्या टोकियो आॅलिम्पिकचा भारतासाठी दहावा कोटा देखील मिळविला आहे. विशेष म्हणजे आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच दीपकने हे यश मिळवले. त्याचवेळी, भारताची युवा स्टार नेमबाज मनू भाकर हिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकरात सुवर्ण वेध घेतला.
टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारा दीपक दहावा भारतीय नेमबाज ठरला आहे. अंतिम फेरीत २२७.८ गुणांची कमाई करत दीपकने कांस्य जिंकले. याआधी पात्रता फेरीत ६२६.८ गुणांची कमाई करीत दीपकने तिसऱ्या स्थानी राहत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. २०१८ साली झालेल्या नेमबाजी विश्वचषकात दीपकने कांस्यपदकाची कमाई केली होती. दहा मीटर एअर रायफल प्रकारात दीपकपूर्वी दिव्यांश सिंग याने आॅलिम्पिक कोटा मिळविला आहे. चीनच्या युकुन लियु (२५०.५) आणि चीनच्याच हाओनान यु (२४९.१) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई केली. गेल्या वर्षी दीपकने गुआडलाजारा आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. त्याने आता आशियाई स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ८.९ गुणांचा वेध घेत सुरुवात केली. मात्र त्याने यानंतर सलग नऊवेळा १० किंवा त्याहून अधिक गुणांचा वेध घेत कांस्य पदकावर नाव कोरले. यामुळे स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला पदक आणि आॅलिम्पिक कोटाही मिळवण्यात यश आले. (वृत्तसंस्था)मनूचा सुवर्णवेध!१७ वर्षीय मनूने अंतिम फेरीत सर्वाधिक २४४.३ गुणांचा वेध घेत १० मीटर पिस्तूल गटात सुवर्ण वेध साधला. म्युनिच विश्वचषक स्पर्धेत वर्चस्व राखत मनूने याआधीच आपल्या गटातील आॅलिम्पिक कोटा मिळवलेला आहे. मनूच्या धडाक्यापुढे चीनच्या कियान वाँग आणि रँक्सिन जियांग यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. याच स्पर्धेतील अन्य भारतीय नेमबाज यशस्विनी सिंग देशवालला सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. याच प्रकारातील तिसरी भारतीय नेमबाज अनू राज सिंग ५६९ गुणांसह २०व्या स्थानी राहिली. या तिघींनी सांघिक गटात एकूण १,७३१ गुण मिळवत कांस्य पदक जिंकले. कोरिया आणि चीनच्या संघाने अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकावले.