नवी दिल्ली : भारताची स्टार जिम्नॅस्ट दीपा करमाकर हिच्या गुडघ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया पार पडली. यामुळे १८ मेपासून थायलंडमध्ये आयोजित आशियाई जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. टिष्ट्वटरवर दीपाने लिहिले,‘सर्वांना नमस्कार एक अपडेट आहे. अलीकडे सरावादरम्यान मी जखमी झाले होते. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे भाग पडले. आता उपचार सुरू असल्याने लवकरच परतणार आहे.’सचिन तेंडुलकरवर उपचार करणारे डॉ. अनंत जोशी यांच्या देखरेखीत दीपावर शस्त्रक्रिया पार पडली. आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती पहिलीच भारतीय महिला जिम्नॅस्ट आहे. रिओ आॅलिम्पिकमध्ये प्रोदुनोव्हा वॉल्ट प्रकारात चौथे स्थान पटकविताच दीपा प्रकाशझोतात आली. ग्लास्गो २०१४ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणारी दीपा या खेळात पदक विजेती पहिलीच भारतीय बनली. (वृत्तसंस्था)
दीपाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया
By admin | Published: April 05, 2017 12:12 AM