नवी दिल्ली : भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीनं टोक्यो 2020 ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत तिला 18 वर्षीय कोरियाच्या अॅन सॅनकडून पराभव पत्करावा लागला. पात्रता फेरीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या दीपिकाला दुसऱ्या मानांकित सॅनकडून कडवी टक्कर मिळाली.
बर्लिन येथे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात दोन सुवर्णपदक जिंकणाऱ्या सॅनने पहिला सेट एका गुणाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही सॅनने 29-25 असा विजय मिळवला. तिसऱ्या सेटमध्येही सॅनचे वर्चस्व राहिले.
दीपिकाला पुढील वर्षी टोक्योत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता निश्चित करता आलेली नाही, परंतु या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन स्वतःच्या कामगिरीत सुधारणा करत ऑलिम्पिक पात्रतेचं तिचं लक्ष्य आहे. ती म्हणाली,''सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास आम्ही ऑलिम्पिक तिकीट मिळवू, अशी अपेक्षा आहे.''