सॅमसन, तुर्की - भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने येथे रविवारी तिरंदाजी विश्वचषक फायनलच्या तणावपूर्ण प्ले आॅफमध्ये लिजा उनरूला पिछाडीवर टाकत कांस्य पदकाची कमाई केली. दोन्ही तिरंदाज पाच सेट संपल्यावर ५ -५ अशा बरोबरीवर होते. त्यामुळे त्यांना शूट आॅफचा सामना करावा लागला. दीपिका आणि लिजा यांनी ९ गुण मिळवले; मात्र दीपिकाचा शॉट जवळ असल्याने ती विजयी ठरली.दीपिका हिने विश्वकप फायनल्समध्ये पाचव्यांदा पदक मिळवले आहे. या आधी ती चार वेळा रौप्यपदकविजेती राहिली आहे. पाचव्या सेटमध्ये ड्रॉसोबत दीपिका तिसरे स्थान मिळवू शकली असती; मात्र प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत ती येथे झुंजताना दिसली. तिचा शॉट बाहेर गेला.या स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी कंपांऊंड मिश्र प्रकारात एक रौप्य जिंकले.पहिल्यांदाच प्रशिक्षकाशिवाय कोणत्याही मोठ्या स्पर्धेत खेळत आहे; मात्र मी खूष आहे. जेवढी कठीण स्पर्धा असते, तेवढेच आम्ही सर्वोत्तम असतो. मी बहुतेक शुटआॅफमध्ये पराभूत होते. त्यामुळे माझ्यावर तणाव होता. मी सर्वोत्तम प्रयत्न केला. मी माझ्या खेळाने संतुष्ट आहे. आशियाई स्पर्धेच्या आधी मला डेंग्यू झाला होता. - दीपिका कुमारी
दीपिका कुमारीला विश्व तिरंदाजीत कांस्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 8:25 AM