नवी दिल्ली : भारताची उत्कृष्ट स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल हिने जुळ्यांना जन्म दिल्यानंतर चार वर्षानंतर कोर्टवर पाय ठेवला. क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची पत्नी असलेली दीपिका मागच्या वर्षी आई बनली होती. यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दीपिकाचा मागील दोन महिन्यापासून सराव सुरू आहे. खेळापासून दूर असताना ३१ वर्षांच्या दीपिकाने इंटेरियर डिझायनर म्हणूनही काम केले. ती बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत दुहेरीत आणि त्यांनतर हाँगजोऊ येथे आशियाई स्पर्धेत एकेरीत खेळण्यावर भर देईल. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराची मानकरी दीपिका- ज्योत्स्ना चिनप्पा यांनी २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी पहिल्यांदा सुवर्ण पदक जिंकले होते. दीपिकाने ब्रेक घेतला त्यावेळी ती जागतिक क्रमवारीत अव्वल २० खेळाडूंमध्ये होती.
‘एक आई आणि व्यावसायिक खेळाडू होणे कठीण असते. जुळी अपत्ये असल्याने मला दुहेरी मेहनत घ्यावी लागते. दिनेश क्रिकेटपटू असल्याने सरावासाठी तो सतत बाहेर असतो. अशावेळी माझ्यावरील जबाबदारी दुप्पट होते. तथापि, कुटुंबाचा भक्कम आधार असल्यामुळे सकाळी तसेच सायंकाळी सराव करण्यास पुरेसा वेळ मिळतो, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान मानते.’- दीपिका पल्लीकल