सॉल्ट लेक सिटी (अमेरिका) : भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने येथे विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत महिला रिकर्व्ह गटात सुवर्णपदक जिंकले. दीपिकाने अंतिम फेरीत जर्मनीच्या मिशेली क्रोपेन हिला ७-३ असे पराभूत केले. अशा प्रकारे तिने सहा वर्षांनंतर जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या कामगिरीच्या बळावर दीपिका तुर्कीच्या सॅमसन येथे होणाऱ्या तिरंदाजी विश्वचषक फायनलसाठी पात्र ठरली आहे. या हंगामातील अखेरच्या विश्वचषक स्पर्धेत ती सातव्यांदा भारताचे प्रतिनिधित्व करेल. दीपिकाने याआधी २०१२ मध्ये अंताल्या येथे जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते, तर २०११, २०१२, २०१३ आणि २०१५ मध्ये झालेल्या विश्वचषकात तिने चार वेळेस रौप्यपदक जिंकले आहे. या कामगिरीनंतर दीपिकाने अखेरीस मी सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.दीपिकाने ३० पैकी २९ गुणांसह सुरुवात केली आणि २-० आघाडी घेतली. त्यानंतर तिने क्रोपेनसह बरोबरीने गुण मिळवले. जर्मन खेळाडूने तिसरा सेट जिंकताना ३-३ अशी बरोबरी साधली. दीपिकाने त्यानंतर २९ आणि २७ स्कोअरवर चौथा आणि पाचवा सेट जिंकला. यादरम्यान क्रोपेनचा स्कोअर २६ राहिला. अशा प्रकारे भारतीय खेळाडूने हा सामना ७-३ असा जिंकला. दीपिका म्हणाली, ‘‘आपल्या खेळाचा आनंद लुटायचा आणि विजय आणि पराभव विसरून सर्वोत्तम कामगिरी करण्याचे मी स्वत:ला सांगत होते.’’ चिनी ताइपेच्या तान या तिंगने महिला रिकर्व्ह गटात कांस्यपदक जिंकले.तथापि, दीपिकाला रिकर्व्ह संमिश्र दुहेरीत निराशा पत्करावी लागली. ती आणि अतनुदास या जोडीला कास्यपदकाच्या लढतीत चिनी ताइपेच्या तांग चीह चून आणि तान या तिंग यांच्याकडून ४-५ असा पराभव पत्करावा लागला.
दीपिकाने जिंकले विश्वचषकात सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 6:56 AM