ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - क्वालिफायर 1 च्या पहिल्या सामन्यात मंगळवारी बलाढय मुंबई इंडियन्सवर रायझिंग पुणे सुपरजायंट्सने 20 धावांनी विजय मिळवला आणि पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात १६ धावांत तीन गडी बाद करणारा वॉशिंग्टन सुंदर सामनावीर ठरला असला तरी, मुंबईच्या या पराभवात मुंबईच्याच खेळाडूंनी महत्वाचे योगदान दिले आहे.
पुण्याकडून खेळणारा मुंबईकर अजिंक्य रहाणेची (56) अर्धशतकी खेळी आणि शार्दुल ठाकूरने घेतलेल्या तीन विकेट पुण्याच्या विजयात महत्वपूर्ण ठरल्या. दोन विकेट झटपट गेल्यानंतर अजिंक्यने तिस-या विकेटसाठी मनोज तिवारी बरोबर 80 धावांची भागीदारी करुन पुण्याच्या डावाला स्थैर्य मिळवून दिले. अजिंक्यने त्याच्या 43 चेंडूतील 56 धावांच्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार लगावला.
दुस-या बाजूला शार्दुल ठाकूरने दमदार गोलंदाजी केली. त्याने अर्धशतक फटकावणारा मुंबईचा महत्वाचा फलंदाज पार्थिव पटेलला 52 धावांवर यष्टीपाठी झेलबाद केले. त्यानंतर कुनाल पांडया, मॅक्लेनघन यांच्या विकेट घेतल्या. शार्दुल आणि अजिंक्य दोघेही मुंबईच्या रणजी संघात खेळतात. त्यामुळे कालच्या मुंबईच्या पराभवात या मुंबईकर खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली असेच म्हणावे लागेल.
आयपीएलच्या या मोसमात मुंबईने पुण्याविरुद्ध पराभवाची हॅट्रीक नोंदवली. मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला. गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर पुणेकरांना ४ बाद १६२ धावांवर रोखल्यानंतर फलंदाजांच्या अपयशामुळे मुंबईला ९ बाद १४२ धावाच काढता आल्या.
सलामीवीर पार्थिव पटेलचा अपवाद वगळता मुंबईचा एकही स्टार फलंदाज चमकला नाही. पार्थिवने एकाकी झुंज देताना ४० चेंडूत ३ चौकार व ३ षटकार ठोकताना ५२ धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्याला इतर कोणत्याही फलंदाजाकडून आवश्यक साथ मिळाली नाही. लेंडल सिमन्स (५), कर्णधार रोहित शर्मा (१), अंबाती रायडू (०), केरॉन पोलार्ड (७), हार्दिक पांड्या (१४) आणि कृणाल पांड्या (१५) अशी मजबूत फलंदाजी स्वस्तात बाद झाली.