मुंबई : गतविजेत्या बलाढ्य एअर इंडियाने १२व्या गुरुतेगबहादूर अखिल भारतीय सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेत आगेकूच केली खरी. मात्र, त्यासाठी त्यांना मध्य रेल्वेविरुद्ध चांगलेच झुंजावे लागले. त्याच वेळी आरसीएफ आणि सीएजी या संघांनी सहज कूच करताना, आपापल्या लढतीत बाजी मारली.चर्चगेट येथील हॉकी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत मध्य रेल्वेने गतविजेत्यांना चांगलेच झुंजवले. एअर इंडियाने आपल्या लौकिकासह आक्रमक सुरुवात करताना रेल्वेला दडपणाखाली ठेवण्यात यश मिळवले. शिवेंद्र सिंगने ११व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर एअर इंडियाने मध्यंतराला १-० अशी आघाडी घेतली. दरम्यान, या गोलनंतर एअर इंडियाने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. मात्र, रेल्वेचा गोलरक्षक अवधूत सोळणकर याच्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही.दुसऱ्या सत्रात मध्य रेल्वेनेही आक्रमक खेळ करताना गतविजेत्यांना कडवी झुंज दिली. जनमा माझी याने ४१व्या मिनिटाला गोल करून एअर इंडियाला २-० अशी आघाडी मिळवून दिली, तर आफान युसुफने ४३व्या मिनिटाला गोल करून रेल्वेची पिछाडी १-२ अशी कमी केली. यानंतर, एअर इंडियाच्या समीर दाडने ६२व्या मिनिटाला संघाला ३-१ असे पुढे नेले, तर हरमीत सिंगने ७०व्या मिनिटाला गोल करून मध्य रेल्वेचा दुसरा गोल केला. यानंतर, रेल्वेने जबरदस्त खेळ करत एअर इंडियाला बचावात्मक भूमिका घेण्यास भाग पाडले. या वेळी त्यांनी एअर इंडियाच्या क्षेत्रात जोरदार हल्ला चढवला. मात्र, एअर इंडियाचा भक्कम बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही. अखेर एअर इंडियाला ३-२ अशा निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले.तत्पूर्वी, झालेल्या एकतर्फी लढतीत बलाढ्य आरसीएफ (कपुरथळा) संघाने वर्चस्व राखताना मुंबई कस्टम्सला ६-३ असे लोळवले. पूनछा एम.जी., करनपाल सिंग, गगनदीप सिंग, संजय बिर, दीपक शर्मा आणि गौरवजीत सिंग यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर आरसीएफने बाजी मारली, तर पराभूत कस्टम्सकडून जयेश जाधवने २ तर विजय थापाने एक गोल केला. अन्य लढतीत सीएजी संघाने हॉकी भोपाळचा ३-० असा धुव्वा उडवला. नवनीत स्वर्णकार, व्ही. समुघन व एस. एस. बुंदेला यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाचा विजय साकारला. सीएजीच्या आक्रमणापुढे भोपाळच्या आव्हानातली हवा निघाली. (क्रीडा प्रतिनिधी)
गतविजेत्या एअर इंडियाची अडखळती आगेकूच
By admin | Published: June 03, 2016 3:35 AM