जयपूर : सलामीवीर समित गोहेलच्या विश्वविक्रमी त्रिशतकाच्या जोरावर गुजरातने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर ओडिसा संघाला नमवून रणजी ट्रॉफी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. गोहेलने अखेरपर्यंत नाबाद राहताना ७२३ चेंडूत तब्बल ४५ चौकार व एका षटकारासह ३५९ धावांचा तडाखा दिला. तर रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात बलाढ्य मुंबईने हैदराबादचा झुंजार प्रतिकार ३० धावांनी मोडून काढताना रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यता पहिल्या डावात २६३ धावा उभारल्यानंतर गुजरातने ओडिसाचा डाव १९९ धावांमध्ये संपुष्टात आणला. यानंतर दुसऱ्या डावात गुजरातने तुफानी फलंदाजी करताना ६४१ धावांचा हिमालय उभा केला. विशेष म्हणजे रणजी स्पर्धेच्या इतिहासात गुजरातची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. याआधी त्यांची सर्वोच्च धावसंख्या ६४० होती. दरम्यान, दुसऱ्या डावात गोहेलने केलेल्या तडाखेबंद फटकेबाजीच्या जोरावर गुजरातने ओडिसापुढे विजयासाठी ७०६ धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले. यानंतर पाचव्या दिवसअखेर ओडिसाने एका फलंदाजाच्या मोबदल्यात ८१ धावा करताना सामना अनिर्णित राखला. परंतु, पहिल्या डावातील निर्णायक आघाडीच्या जोरावर गुजरातने आगेकूच केली. (वृत्तसंस्था)११७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित..२६ वर्षीय समित गोहिलने नाबाद ३५९ धावांची विश्वविक्रमी खेळी करताना तब्बल ११७ वर्ष जुना कायम असलेला विक्रम मागे टाकण्याचा पराक्रम केला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करताना सर्वोच्च खेळी करण्याचा विश्वविक्रम हनीफ मोहम्मद यांच्या नावावर अद्याप कायम आहे. त्यांनी डावाची सुरुवात करताना ४९९ धावा कुटल्या आहेत. मात्र, सलामीवीर म्हणून खेळताना डावाच्या अखेरपर्यंत नाबाद राहून सर्वोच्च धावसंख्या रचण्याचा जागतिक विक्रम गोहिलने केला आहे. याआधी हा विश्वविक्रम बॉबी एबेल यांच्या नावावर होता. त्यांनी सरेकडून खेळताना १८९९ मध्ये समरसेटविरुध्द ३५७* धावांची खेळी केली होती.संक्षिप्त धावफलकगुजरात (पहिला डाव) : ९५.४ षटकात सर्वबाद २६३ धावा (चिराग गांधी ८१, रुश कलारिया ७३; बसंत मोहंती ५/६८, दीपक बेहेरा ३/५०).ओडिसा (पहिला डाव) : ७३.१ षटकात सर्वबाद १९९ धावा. (सुर्यकांत प्रधान ४७, संदीप पटनाईक ४३; जसप्रीत बुमराह ५/४१).गुजरात (दुसरा डाव) : २२७.४ षटकात सर्वबाद ६४१ धावा. (समित गोहेल नाबाद ३५९, प्रियांक पांचाळ ८१; धिरज सिंग ६/१४७).ओडिसा (दुसरा डाव) : २२ षटकात १ बाद ८१ धावा. (सुभ्रांशु सेनापती नाबाद ५९, रणजीत सिंग नाबाद १८; रुजुल भट १/२३).
गतविजेत्या मुंबईसह गुजरात उपांत्य फेरीत
By admin | Published: December 28, 2016 3:11 AM