सौरव गांगुली लिहितो़..भारत-विंडीजदरम्यान रंगणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी मैदान सजले आहे. माझ्या मते, उपांत्य फेरी गाठणारे सर्वच संघ दावेदार होते. या चारही संघांनी सकारात्मक कामगिरी करून हे स्थान गाठले. या चारही संघांनी फिरकीला यशस्वीपणे तोंड दिले. फिरकी गोलंदाजी ही भारतीय उपखंडाची खरी ओळख आहे. इंग्लंडचा अपवाद वगळता सर्वच संघांत चांगले फिरकी गोलंदाज आहेत. भारत-आॅस्ट्रेलिया सामन्याबद्दल अनेक गोष्टींचा उल्लेख झाला; पण माझ्या मते, कांगारूंना येथे खेळताना फिरकीविरुद्ध चांगलेच झगडावे लागते.विंडीजकडे चांगलेच स्पिनर आहेत. सुलेमान बेन आणि सॅम्युअल बद्री यांना बळी मिळत आहेत. वानखेडेची खेळपट्टी टणक राहल्यास विंडीजचे फिरकी गोलंदाज परिस्थितीचा लाभ घेण्याची एकही संधी सोडणार नाहीत.दोन्ही संघांची आणि त्यातही भारताची भिस्त फलंदाजीवर अधिक असेल. विराटचा अपवाद वगळात अन्य फलंदाज फॉर्ममध्ये नाहीत. टणक खेळपट्टीवर वेळेची मागणी पाहता, अन्य फलंदाज भारतासाठी धावा काढतील, अशी मला आशा आहे.कोहलीच्या कामगिरीची फार चर्चा सुरू आहे. गुरुवारी विराट मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला, तर अन्य खेळाडूंना ही उणीव भरून काढावीच लागेल. भारतीय संघाच्या कामगिरीची तर चर्चा होतच आहे; पण विंडीजची कामगिरी नजरेआड करता येणार नाही. विंडीजने आपल्या गटात द. आफ्रिका, लंका आणि इंग्लंडला धूळ चारली आहे.टी-२० फॉरमॅटच्या दावेदारांबद्दल मी अधिक भाष्य करणार नाही. त्या दिवशीच्या खेळावर बरेच काही अवलंबून असते. ‘गेल विरुद्ध विराट’ असाही माहोल तयार केला जात आहे; पण संघाच्या विजयात अन्य खेळाडूंची भूमिकाही तितकीच निर्णायक असते. दोन्ही संघांना चांगल्या गोलंदाजांची साथ लाभेल; त्यामुळे गेलला बुमराह, आश्विन आणि नेहरा यांच्याकडून कडवे आव्हान मिळेल. बद्री आणि बेन हे भारतीय फलंदाजांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करतील. जखमी झाल्याने युवराज स्पर्धेबाहेर पडला आहे. रहाणे त्याचा उत्तम पर्याय असू शकतो. संघाची मधली फळी फॉर्ममध्ये नाही; त्यामुळे अशा स्पर्धेत रहाणेसारख्या दर्जेदार फलंदाजाची भूमिका मोलाची ठरेल. संघाला एक फिरकीपटू अधिक खेळवायचा असेल, तर बुमराहला बाहेर बसवून एक मध्यम जलद गोलंदाज खेळविता येईल. विकेट बॅटिंगसाठी योग्य असेल, तर युवीची जागा रहाणे घेऊ शकतो.(गेमप्लान)
गोलंदाजांची भूमिका ठरणार निर्णायक !
By admin | Published: March 31, 2016 3:07 AM