उदय बिनिवालेलंडन : विम्बल्डन स्पर्धेतील अनेक खेळाडूंनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी वार्तालाप साधला. अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खेळाडूंनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
फेडरर म्हणाला, ‘विम्बल्डन स्पर्धेनंतर खेळाचा आढावा घेऊन ऑलिम्पिकबाबत अंतिम निर्णय घेणे योग्य होइल. जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये भाग घेण्याकडे माझा कल असेल. वयाच्या चाळिशीचा मी फारसा विचार करत नाही. ‘टेनिस कोर्टवर’ खेळणे मला आवडते.’अँडी मरे म्हणाला, ‘१८ महिन्यांच्या ताण - तणावाच्या आणि काळजीच्या वातावरणानंतर प्रेक्षकांसमोर महत्त्वाच्या स्पर्धेत खेळताना निश्चितच आनंद होतोय. विशेषतः रॉजर फेडररसारख्या महान खेळाडूबरोबर सराव करताना खूप अनुभव आणि आनंद मिळाला. पूर्ण मानसिक आणि शारीरिक क्षमता पणाला लावून या स्पर्धेत खेळणार आहे.’
ऐश बार्टी म्हणाली, ‘विम्बल्डन खेळण्यात आम्हाला धन्यता वाटते. इंग्लंड क्लबमध्ये प्रवेश करतानाच एक वेगळा अनुभव जाणवतो. महिला खेळाडूतील जोकोविच हे संबोधन कसे वाटते, याबाबत बार्टी म्हणाली, मी ऐश बार्टी आहे अणि आनंदी आहे. इथे खेळणारे सर्वच खेळाडू दर्जेदार अणि विजेतेपदाचे दावेदार असतात. ग्रास कोर्टवर खेळणे मला आवडते. टेनिसचा जन्मच मुळात ग्रास कोर्टवर झाला. लहानपणापासूनच हे स्वप्न मी जपले आहे.’