नवी दिल्ली : दीपक हुड्डाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या आठव्या पर्वात रविवारी अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ३ गडी राखून पराभव केला. या विजयासह राजस्थान रॉयल्सने दिल्ली संघावरील वर्चस्व कायम राखले. दिल्ली डेअरडेव्हिल्सने ३ बाद १८४ धावांची दमदार मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करताना दीपक हुड्डा (२५ चेंडू, ५४ धावा) व अजिंक्य रहाणे (४७) यांनी उल्लेखनीय योगदान देत राजस्थान रॉयल्स संघाला विजय मिळवून दिला. इम्रान ताहिर (४-२८) व अमित मिश्रा (२-३२) यांच्या अचूक माऱ्यानंतरही डेअरडेव्हिल्स संघाला पराभवाचे दुष्टचक्र भेदण्यात अपयश आले. राजस्थान रॉयल्सला अखेरच्या षटकात विजयासाठी १२ धावांची गरज होती. टीम साऊदीने (नाबाद ७) अखेच्या चेंडूवर चौकार ठोकत राजस्थानला संस्मरणीय विजय मिळवून दिला. क्रिस मॉरिसने (नाबाद १३) चौकार ठोकत राजस्थानच्या विजयाच्या आशा कायम राखल्या. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ३ धावांची गरज असताना साऊदीने चौकार ठोकला. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा आयपीएल स्पर्धेतील हा सलग ११ वा पराभव ठरला. सलग पराभव स्वीकारण्याच्या बाबतीत डेअरडेव्हिलने आज पुणे वॉरियर्स संघाच्या कामगिरीची बरोबरी केली. रहाणेने आज सावधगिरी व आक्रमकता याचा अचूक मेळ साधला. सुरुवातीला रहाणेने जयदेव उनाडकट व नॅथन कुल्टर नाईलच्या गोलंदाजीवर षटकार वसूल केले. संजू सॅम्सन (११) व कर्णधार स्टीव्हन स्मिथ (१०), करण नायर (२०) व स्टुअर्ट बिन्नी (१) यांना मोठी खेळी करता आली नाही.त्याआधी, आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने ३ बाद १८४ धावांची दमदार मजल मारली. मयंक अग्रवाल (३७ धावा, २१ चेंडू),श्रेयस अय्यर (४० धावा, ३० चेंडू), कर्णधार जेपी ड्युमिनी (नाबाद ४४ धावा, ३८ चेंडू) आणि अॅन्जेलो मॅथ्यूज (नाबाद २७ धावा, १४ चेंडू) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. डेअरडेव्हिल्सने अखेरच्या तीन षटकांत ४३ धावा वसूल केल्या. शेन वॉटसन अद्याप फिट नसल्यामुळे स्टिव्हन स्मिथला पुन्हा एकदा नाणेफेकीसाठी मैदानात उतरावे लागले. स्मिथने नाणेफेकीचा कौल मिळवत डेअरडेव्हिल्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. डेअरडेव्हिल्सतर्फे श्रेयस अय्यर व अग्रवाल यांनी सलामीला ४५ धावांची भागीदारी करीत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यात अग्रवालचे योगदान ३७ धावांचे होते. अग्रवालच्या खेळीत ६ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. स्मिथला पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात फिरकीपटू प्रवीण तांबेकडे चेंडू सोपवावा लागला. तांबेने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना अग्रवालला माघारी परतवले व राजस्थान संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अय्यरने जेम्स फॉल्कनर, तांबे व ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत धावगतीला वेग दिला. अय्यरचा अडथळा मॉरिसने दूर केला. अय्यरने तीन चौकार व तीन षटकार ठोकले. तामिळनाडू सरकारच्या नीतीमुळे गेल्या लढतीला मुकलेल्या मॅथ्यूजने आज चमकदार कामगिरी केली. त्याने फॉल्कनरला लक्ष्य करीत दोन चौकार वसूल केले आणि त्यानंतर ‘काऊ कॉर्नर’ला षटकार ठोकला. महागडा ठरलेल्या फॉल्कनरने चार षटकांत ५५ धावा बहाल केल्या. मॉरिसने ४ षटकांत ३५ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. ड्युमिनीने अखेरच्या षटकात दोन षटकार ठोकले. (वृत्तसंस्था)
दिल्ली पुन्हा ‘अनलकी’
By admin | Published: April 13, 2015 3:47 AM