नवी दिल्ली : युवा फलंदाजांच्या बळावर मागच्या दोन्ही सामन्यांत अवघड लक्ष्य सर करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचे टार्गेट ‘प्ले आॅफ’मध्ये धडक देणे हेच आहे. त्या चढाओढीत आज, शनिवारी विजयी पथावर स्वार असलेल्या मुंबई इंडियन्सला पराभूत करण्याचे आव्हान दिल्लीपुढे असेल.सुरुवातीच्या काही सामन्यांत अडखळणाऱ्या दिल्लीवर बाद फेरीबाहेर पडण्याची वेळ आली होती; पण दोन सामन्यांत दमदार कामगिरीसह संघाने मुसंडी मारली. हैदराबादने दिलेले १८९ आणि गुजरातचे २०८ धावांचे आव्हान दिल्लीच्या युवा फलंदाजांनी लीलया सर केले. दिल्लीचे दहा सामन्यांत आठ गुण आहेत. उर्वरित चार सामने जिंकल्यास प्ले आॅफमध्ये हमखास स्थान मिळेल. मुंबईने १० पैकी ८ सामने जिंकले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा संघ पहिल्या दोन स्थानांवर हक्क सांगू शकतो. दिल्लीची जमेची बाब अशी की, त्यांचे फलंदाज योग्यवेळी फॉर्ममध्ये परतले. सनरायजर्सविरुद्ध आघाडीच्या फळीतील सर्वच फलंदाजांनी धावा केल्या. गुजरातविरुद्ध ऋषभ पंत आणि संजू सॅमसन चमकले. दिल्लीचा कर्णधार जहीर खान खेळणार की नाही याविषयी शंका आहे. त्याच्या पायाचे स्नायू दुखावले होते. त्याच्या अनुपस्थितीत करुण नायर काळजीवाहू कर्णधार असेल. (वृत्तसंस्था)गोलंदाजांना देखील टिच्चून मारा करण्याचे आव्हान असेल. कासिगो रबाडा, पॅट कमिन्स, मोहम्मद शमी, अमित मिश्रा आणि शादाब नदीम गेल्या दोन्ही सामन्यात चांगला मारा करू शकले नव्हते. याशिवाय क्षेत्ररक्षणही सुधारण्याची गरज आहे. फिरोजशाह कोटलाची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल दिसत आहे. मुंबईसाठी सर्व काही चांगले सुरू आहे. मागच्या सामन्यात आरसीबीवर विजय नोंदवित प्ले आॅफ गाठणारा मुंबई पहिला संघ ठरला. त्या सामन्यात रोहितने ५६ धावा ठोकून कर्णधाराच्या भूमिकेला न्याय दिला. नीतीश राणा हा युवा फलंदाज सातत्याने धावा काढत आहे. फिरोजशहा कोटलाच्या खेळपट्टीची त्याला बऱ्यापैकी माहिती आहे. गोलंदाजीत मिशेल मॅक्लाघन, लसिथ मलिंगा, जसप्रित बुमराह, हरभजनसिंग हे प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. (वृत्तसंस्था)
‘प्ले आॅफ’ फेरी गाठण्यासाठी दिल्लीला हवा मुंबईवर विजय
By admin | Published: May 06, 2017 12:54 AM