नवी दिल्ली : फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या पहिल्याच सामन्यात यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्सने बाजी मारली. सलामीवीर सॅम बिलिंग (५५) आणि कोरी अँडरसन (नाबाद ३९) यांच्या धडाकेबाज फलंदाजीनंतर शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीने पंजाबचा ५१ धावांनी पराभव केला. दिल्ली डेअरडेव्हिल्सने २० षटकांत ६ बाद १८८ धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ १३७ धावांवर तंबूत परतला. कोरी अँडरसन सामनावीर ठरला.प्रत्युत्तरात, पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. संथ सुरुवातीनंतर सलामीवर मनन वोहरा अवघ्या ३ धावांवर बाद झाला. वृद्धिमन साहा (७) बाद झाल्यानंतर हाशीम आमला आणि मॉर्गन यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मॉरीसने आमलाला मोक्याच्या क्षणी बाद करीत धक्का दिला. कर्णधार मॅक्सवेल शून्यावर आणि मिलर २४ धावा काढून तंबूत परतले. त्यामुळे पंजाब १३.४ षटकांत ६ बाद ८८ अशा स्थितीत होता. अक्षर पटेलने फटकेबाजी केली. त्याने सर्वाधिक ४४ धावा केल्या. इतर फलंदाज अपयशी ठरल्याने त्याची एकाकी झुंज व्यर्थ ठरली. दिल्लीकडून मॉरीसने सर्वाधिक ३, नदीम आणि कमिन्स यांनी प्रत्येकी २बळी घेतले. त्याआधी, दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय सलामीवीर संजू सॅमसन आणि सॅम बिलिंग यांनी योग्य ठरवत संघाला अर्धशतकी सलामी दिली. पंजाबचा फिरकी गोलंदाज करियप्पा याला षटकार ठोकत सॅमसनने आपला आक्रमक इरादा स्पष्ट केला; परंतु पुढच्याच चेंडूवर करियप्पाने त्याला बाद करून दिल्लीची सलामी जोडी फोडली. सॅमसनने १९ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावरील करूण नायरला भोपळाही फोडता आला नाही. वरूण अॅरोनने त्याला बाद केले.श्रेयस अय्यर (२२) आणि रिषभ पंत (१५) यांनी फटकेबाजीचा सिलसिला पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यांना अनुक्रमे मोहित शर्मा आणि वरूण अॅरोन यांनी बाद केले. जम बसलेल्या अर्धशतकवीर बिलिंगला अक्षर पटेलने बाद केले. शेवटच्या षटकांत फटकेबाजी करत कोरी अॅँडरसनने (नाबाद ३९) दिल्लीला मोठी धावसंख्या गाठून दिली.संक्षिप्त धावफलकदिल्ली डेअरडेव्हिल्स २० षटकांत ६ बाद १८८. (बिलिंग ५५, अय्यर २२, अॅँडरसन नाबाद ३९, मॉरीस १६. गोलंदाजी- अॅरोन ४५/२, संदीप शर्मा, मोहित शर्मा, अक्षर पटेल आणि करीअप्पा प्रत्येकी एक बळी. वि. वि. किंंग्स इलेव्हन पंजाब २० षटकांत ९ बाद १३७ धावा. (मॉर्गन २२, मिलर २४, अक्षर पटेल ४४, गोलंदाजी - मॉरीस २३/३, नदीम १३/२. कमिन्स २३/२, मिश्रा आणि अॅँडरसन प्रत्येकी एक बळी.)
‘कोटला’वर दिल्लीची बाजी
By admin | Published: April 16, 2017 3:48 AM