ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २३ - दिल्ली डेअरडेव्हिल्सने मुंबई इंडियन्ससमोर 165 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सुरुवात चांगली करत 8 ओव्हरमध्ये 54 धावात 3 विकेट्स मिळवल्या होत्या. पण त्यानंतर फक्त एकच विकेट गोलंदाजांना मिळवता आली. दिल्ली डेअरडेव्हिल्सने 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावत 164 धावा केल्या आहेत.
क्विंटन डीकॉकने स्फोटक सुरुवात करत सुरुवातीलाच दोन चौके लगावले. मात्र त्यानंतर लगेचच 9 धावांवर आपली विकेट गमावली. संजू सॅमसनने 48 चेंडूत 60 धावा केल्या तर ड्युमिनीने 31 चेंडूत 49 धावा केल्या. दोघांनी केलेल्या धावांमुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सला 165 धावांचं आव्हान उभं करता आलं. ड्युमिनी नाबाद राहिला पण एका रनसाठी त्याची हाफ सेंच्यूरी हुकली.
गतचॅम्पियन मुंबई इंडियन्सला हरवून दिल्ली डेअरडेव्हिल्सला विजयाची हॅट्ट्रीक साधण्याची संधी आहे. सलामी लढतीत कोलकाताविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या दिल्लीने त्यानंतर दमदार पुनरागमन करीत पंजाब व बंगळुरू संघांचा पराभव केला. तीन सामन्यांत चार गुणांची कमाई करणारा दिल्ली संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे तर मुंबई संघ दोन विजय व तीन पराभवासह पाचव्या स्थानी आहे.
मुंबईची आतापर्यंतची कामगिरी संमिश्र ठरली आहे. पंजाब व बंगळुरु विरुद्ध विजय मिळवणाऱ्या मुंबईला पुणे, गुजरात व हैदराबाद विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.