ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 10 - श्रेयस अय्यरने केलेल्या 96 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत गुजरात लायन्सवर दोन गडी राखून मात केली. गुजरातने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रेयसने एक बाजू लावून धरत धडाकेबाज खेळी केली आणि दिल्लीचा विजय निश्चित केला.
196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संजू सॅमसन (10) आणि ऋषभ पंत (4) हे झटपट माघारी परतले. पण एक बाजू लावून धरणाऱ्या श्रेयस अय्यरने 57 चेंडूत 96 धावांची खेळी करताना इतर खेळाडूंसोबत छोट्या पण महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या रचत दिल्लीला विजयासमीप पोहोचवले. मात्र अय्यरचे शतक अवघ्या 4 धावांनी हुकले. शेवटच्या षटकात अय्यर बाद झाल्याने दिल्लीच्या गोटात धाकधूक निर्माण झाली. पण अमित मिश्नाने सलग दोन चौकार ठोकर दिल्लीला विजय मिळवून दिला.
आरोन फिंच आज आक्रमक अर्धशतकी खेळी करत दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. फिंच, दिनेश कार्तिक आणि इशान किशनने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर गुजरात लायन्सने आयपीएलमध्ये आज झालेल्या एकमेव लढतीत 20 षटकात 5 बाद 195 धावा फटकावत दिल्लीसमोर विजयासाठी 196 धावांचे आव्हान ठेवले.
दोन्ही संघांचे स्पर्धेतील आव्हान याआधीच संपल्याने केवळ औपरचारिकता असलेल्या आजच्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मात्र या निर्णयाचा दिल्लीकर गोलंदाजांना फारसा लाभ झाला नाही. ड्वेन स्मिथ (8), सुरेश रैना (6) आणि इशान किशन हे झटपट बाद झाल्याने एकवेळ दिल्लीची सामन्यावर पकड निर्माण झाली होती.
पण 39 चेंडूत 69 धावा कुटणारा फिंच आणि 28 चेंडूत 40 धावा फटकावणाऱ्या दिनेश कार्तिकने दिल्लीच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवत चौथ्या गड्यासाठी 93 धावांची भागीदारी केली. हे दोघेही बाद झाल्यावर रवींद्र जडेजा (नाबाद 13) आणि जेम्स फॉकनर (नाबाद 14 ) यांनी सहाव्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी करत गुजरातला 20 षटकात 5 बाद 195 धावांपर्यंत मजल मारून दिली.