दिल्ली रणजी
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM
शार्दुलचा अचूक मारा, दिल्ली १६६ धावांत गारद
शार्दुलचा अचूक मारा, दिल्ली १६६ धावांत गारदकटक : वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या अचूक माऱ्याच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दिल्ली संघाचा पहिला डाव १६६ धावांत गुंडाळला. ठाकूरने ५४ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. मुंबईच्या पहिल्या डावातील १५६ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना दिल्ली संघ १० धावांची निसटती आघाडी घेण्यात यशस्वी ठरला. आदित्य तारेच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी मुंबई संघाने दुसऱ्या डावात १ बाद ८७ धावांची मजल मारली होती. मुंबई संघाकडे एकूण ७७ धावांची आघाडी असून त्यांच्या ९ विकेट शिल्लक आहेत. आजचा खेळ थांबला त्यावेळी सलामीवीर अखिल हेरवाडकर (नाबाद ५२) व श्रेयस अय्यर (नाबाद १२) खेळपट्टीवर होते. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. त्याआधी, ठाकूरचा सहकारी बलविंदर संधू (२-४३) याने उन्मुक्त चंद (१५) याला माघारी परतवत दिल्ली संघाला पहिला धक्का दिला. विल्किन मोटा(२-४७) याने गौतम गंभीरला (५) माघारी परतवले. शिवम र्श्मा (३०) व वीरेंद्र सेहवाग (४९) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. ठाकूरने सेहवागला धावबाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. ठाकूरने त्यानंतर अचूक मारा करीत मिथुन मन्हास (००) याला माघारी परतवले. त्यानंतर त्याने दिल्ली संघाच्या तळाच्या फलंदाजांना एकापाठोपाठ बाद करीत दिल्लीचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. (वृत्तसंस्था)