बंगळुरू : भारताचा वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नाबाद ७० धावादेखील झारखंडला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत. दिल्लीने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत झारखंडवर ९९ धावांनी दणकेबाज विजय मिळविताना दिमाखात उपांत्य फेरी गाठली. अष्टपैलू कामगिरी करणारा पवन नेगी सामनावीर ठरला.प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने ५० षटकांत २२५ धावा केल्या. त्यांच्याकडून नितीश राणा याने सर्वाधिक ४४ धावांचे योगदान दिले, तर पवन नेगी ३८ धावांवर नाबाद राहिला. कर्णधार गौतम गंभीर २० चेंडूंत २० धावा काढून धावबाद झाला. झारखंडकडून राहुल शुक्लाने ६० धावांत ३, तर वरुण अॅरॉन आणि अंकित डबास यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.प्रत्युत्तरात झारखंडचा संघ ३८ षटकांत १२६ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून धोनीने १०८ चेंडूंत ५ चौकार, ४ षटकारांसह ७० धावांची नाबाद खेळी केली; परंतु दुसऱ्या बाजूने त्याला तोडीची साथ मिळू शकली नाही. झारखंडच्या आठ फलंदाजांना दुहेरी आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. झारखंडची सुरुवात खराब झाली आणि सहाव्या षटकात ९ धावा धावफलकावर असतानाच त्यांनी ४ फलंदाज गमावले होते. धोनीशिवाय कुशाल सिंह (११) व डबास (१६) हेच दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकले. दिल्लीकडून सुबोध भाटीने ४ व नवदीप सैनी याने ३ व ईशांत शर्माने २ गडी बाद केले.त्याआधी दिल्लीकडून एकही फलंदाज अर्धशतक ठोकू शकला नाही; परंतु त्यांच्या आघाडीच्या आठ फलंदाजांनी उपयुक्त योगदान दिले. नितीश राणा याने ७६ चेंडूंत ५ चौकारांसह सर्वाधिक ४४ धावा केल्या. सामनावीर पवन नेगीने १६ चेंडूंत ३ चौकार, ३ षटकारांसह नाबाद ३८ धावा केल्या. (वृत्तसंस्था) >> संक्षिप्त धावफलकदिल्ली : ५० षटकांत सर्व बाद २२५. (एन. राणा ४४, पवन नेगी ३८, ऋषभ पंत २४, शिखर धवन २७. वरुण अॅरॉन २/४३, राहुल शुक्ला ३/६०, अंकित डबास २/४५)झारखंड ३८ षटकांत सर्व बाद १२६. (महेंद्रसिंह धोनी नाबाद ७०, डबास १६. सुबोध भाटी ४/२१, ईशांत शर्मा २/२१, नवदीप सैनी ३/३१, नेगी १/२१).
दिल्ली उपांत्य फेरीत
By admin | Published: December 23, 2015 11:46 PM