नवी दिल्ली : विश्वचषक विजेत्या कोचची गच्छंती, ११ खेळाडूंना रिलीज करणे तसेच जवळपास संपूर्ण संघ नव्याने बांधल्यानंतर आयपीएलच्या नवव्या सत्रात दिल्ली डेअरडेव्हिल्सचे नशीब पालटणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.मागच्या सत्रात दिल्ली संघ माघारला होता. नवव्या सत्रात कोच गॅरी कर्स्टन यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. लिलावाआधीच एकाच वेळी ११ खेळाडूंना रिलीज करण्यात आले. नव्याने संघबांधणीदेखील झाली. राहुल द्रविड याला संघाचा मेंटर नियुक्त करण्यात आले. पेडी उप्टन यांच्यावर कोचपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याला कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले. या सर्व बदलानंतर पुढील दीड महिन्यात या संघाचे नशीब फळफळणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.नव्या संघाचे नेतृत्व ३७ वर्षांचा झहीर करणार असून, १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करिअरचा निश्चितपणे अनुभव कामी येणार आहे. झहीरचा फिटनेस हा देखील चर्चेचा विषय आहे. झहीर स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचे नेतृत्व करायचा. गेल्या काही वर्षांत तो जखमांनी त्रस्त होता. त्याच्यावर नेतृत्व करण्याचे शिवाय गोलंदाजीतही चमकण्याचे दडपण असेल. गेल्या तीन मोसमांत दिल्लीची स्थिती अत्यंत खराब होती. जय-पराजयाच्या काटेरी वाटेवरून मार्ग काढणारा हा संघ स्वत:ला सिद्ध करू शकला नाही. २०१५ मध्ये आठ संघांच्या चढाओढीत हा संघ सातव्या स्थानावर घसरला. दिल्ली संघ ११ गुणांवर समाधानी राहिला. २०१४ च्या मोसमात दिल्लीची कामगिरी खराबच होती. हा संघ आठव्या स्थानावर राहिला. त्याआधी २०१३ मध्ये १६ पैकी १३ सामने गमविताच संघाला अखेरच्या स्थानावर राहावे लागले होते. सध्या संघात नवे चेहरे आले आहेत. लिलावात साडेआठ कोटींत विकला गेलेला पवन नेगी याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकात त्याचा समावेश करण्यात आला होता. इंग्लंडविरुद्ध फायनलमध्ये चार चेंडंूत चार षट्कार खेचणाऱ्या कार्लोस ब्रेथवेटचाही दिल्ली संघात समावेश आहे. श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन संघाला भक्कम करण्यास सज्ज आहेत. (वृत्तसंस्था)
द्रविड पालटणार दिल्लीचे नशीब ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2016 3:38 AM