कोलकाता : ब्रॅड हॉग व आंद्रे रसेल यांच्या भेदक गोलंदाजीनंतर कर्णधार गौतम गंभीर व रॉबिन उथप्पा यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने घरच्या मैदानावर दिल्ली डेअरडेव्हील्सचा ९ विकेट्सने धुव्वा उडवून आयपीएलच्या नवव्या सत्रात दणदणीत विजयी सलामी दिली. कोलकाताच्या गोलंदाजीपुढे ढेपाळलेल्या दिल्लीकरांनी यानंतर गंभीर व उथप्पा यांच्या फटकेबाजीपुढे शरणागती पत्करली.इडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून केकेआर कर्णधार गौतम गंभीरने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. रसेल व हॉग यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर कोलकाताने दिल्लीचा डाव केवळ ९८ धावांत संपुष्टात आणला. या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना उथप्पा - गंभीर यांनी केलेल्या ६९ धावांच्या शानदार सलामीच्या जोरावर कोलकाताने बाजी मारली. १४.१ षटकातच विजय निश्चित करताना कोलकाताने केवळ एक फलंदाज गमावून ९९ धावा काढल्या. उथप्पा ३३ चेंडूत ७ चौकारांसह ३५ धावा काढून परतला. तर गंभीरने अखेरपर्यंत नाबाद राहताना ४१ चेंडूत ५ चौकारांसह ३८ धावांची खेळी केली. मनिष पांड्येनेही गंभीरला अखेरपर्यत साथ देताना नाबाद १५ धावांची आक्रमक खेळी केली. तत्पूर्वी, सलामीवीर क्विंटन डीकॉकने आपला टि२० विश्वचषकपासून असलेला फॉर्म कायम राखताना केकेआर गोलंदाजांवर हल्ला चढवला. मात्र रसेलने तिसऱ्या षटकात डीकॉकसह गतमोसमात दिल्लीचा यशस्वी फलंदाज ठरलेल्या श्रेयश अय्यरचा अडसर दूर करुन यजमानांचे वर्चस्व निर्माण केले.विशेष म्हणजे डीकॉकने फटकावलेल्या १७ धावा दिल्लीच्या डावातील सर्वाधिक वैयक्तिक खेळी ठरली. यावरुनच दिल्लीकरांची दाणादाण लक्षात येते. यानंतर मयांक अगरवाललाही बाद करुन रसेलने दिल्लीला बचावात्मक भूमिका घेण्यास भाग पाडले. करुण नायर, विंडिजच्या विश्वकपचा हिरो क्रेग ब्रेथवेट, संजू सॅमसन, ख्रिस मॉरिस अपयशी ठरले. दहाव्या षटकातच दिल्लीने ५५ धावांवर अर्धा संघ गमावला होता. यानंतर हॉग व पीयुष चावला यांनी आपल्या फिरकीच्या जोरावर दिल्लीचा डाव झटपट गुंडाळला. रसेल (३/२४), हॉग (३/१९) यांच्या भेदकतेला जॉन हॅस्टींग्स (२/६) व पीयुष (२/२१) यांची उत्कृष्ट साथ मिळाली.> धावफलक :दिल्ली डेअरडेव्हील्स : मयांक अगरवाल झे. हॉग गो. रसेल ९, क्विंटन डीकॉक झे. पठाण गो. रसेल १७, श्रेयश अय्यर पायचीत गो. रसेल ०, करुण नायर झे. पांडे गो. हॅस्टींग्स ३, संजू सॅमसन झे. उथप्पा गो. हॉग १५, पवन नेगी यष्टीचीत उथप्पा गो. हॉग ११, क्रेग ब्रेथवेट पायचीत गो. पीयुष ६, ख्रिस मॉरीस त्रि. गो. पीयुष ११, नॅथन कुल्टर - नाइल नाबाद ७, अमित मिश्रा झे. गंभीर गो. हॉग ३, झहीर खान झे. पांडे गो. हॅस्टींग्स ४. अवांतर - १२. एकूण : १७.४ षटकांत सर्वबाद ९८ धावा. गोलंदाजी : आंद्रे रसेल ३-०-२४-३; उमेश यादव ३-०-२१-०; जॉन हॅस्टींग्स २.४-१-६-२; कॉलिन मुन्रो १-०-७-०; ब्रॅड हॉग ४-१-१९-३; पीयुष चावला ४-०-२१-२.कोलकाता नाइट रायडर्स : रॉबिन उथप्पा झे. मॉरीस गो. मिश्रा ३५, गौतम गंभीर नाबाद ३८, मनिष पांड्ये नाबाद १५. अवांतर - ११. एकूण : १४.१ षटकांत १ बाद ९९ धावा. गोलंदाजी : नॅथन कुल्टर-नाइल ४-०-३२-०; झहीर खान २.१-०-२४-०; ख्रिस मॉरीस ४-०-२१-०; क्रेग ब्रेथवेट २-०-९-०; अमित मिश्रा २-०-११-१.
दिल्लीची दाणादाण
By admin | Published: April 11, 2016 2:12 AM