नवी दिल्ली : १५ वर्षांच्या अप्रतिम आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा वेगवान डावखुरा गोलंदाज झहीर खानने संधी मिळाल्यास टीम इंडियाचे कोचपद सांभाळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.३७ वर्षांचा झहीर एका टीव्ही वाहिनीला मुलाखत देताना म्हणाला, ‘‘क्रिकेट ही माझी पहिली पसंती आहे. निवृत्तीनंतर कोच या नात्याने मी खेळाशी जुळून राहू इच्छितो.’’ ‘भारतीय संघाचा पुढील गोलंदाजी कोच बनणे आवडेल का,’ असे विचारताच झहीर म्हणाला, ‘‘मी दीर्घकाळ देशाचे प्रतिनिधित्व केले. वर्षानुवर्षे या खेळाशी निगडित आहे. क्रिकेटने मला जे काही दिले, ते परत करण्याची वेळ आली आहे. मला ही जबाबदारी मिळाल्यास सर्वोत्तम देण्याचा माझा प्रयत्न असेल.’’निवृत्तीचे निश्चित कारण काय, या प्रश्नाच्या उत्तरात झहीर म्हणाला, ‘‘निश्चित कारण सांगणे कठीण आहे; पण मोसमाची तयारी करायला लागलो तेव्हा शरीर साथ देत नसल्याचे लक्षात आले. त्याच वेळी क्रिकेट थांबविण्याची हीच वेळ योग्य असल्याची खात्री पटली. राजकारणाबाबत बोलायचे झाल्यास तसा काहीही विचार मनात नाही. राजकारणाचा विचारही मनात डोकावलेला नाही. सर्व लक्ष सध्या क्रिकेटवर आहे.’’(वृत्तसंस्था)
गोलंदाजी कोच बनण्याची इच्छा
By admin | Published: October 16, 2015 11:47 PM