झुरिच : आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) नवनिर्वाचित अध्यक्ष गियानी इन्फैनटिनो यांनी आगामी वर्षात भारतात हा खेळ विकसित होताना आपल्याला पाहायचे असल्याचे सांगितले.गियानी म्हणाले, ‘‘मला मुलांना शाळेत फुटबॉल खेळताना पाहायचे आहे. भारत आणि चीनसारखे देश फुटबॉलमध्ये पुढे यावेत, अशी आपली इच्छा आहे. मी पूर्ण जगभरात फुटबॉल वाढताना पाहू इच्छितो. विविध देशांतील लोकही आपल्या येथे फुटबॉल वाढावा, यासाठी फिफाकडून अपेक्षा बाळगत आहेत.’’भारत अजूनही फिफा रँकिंगमध्ये १६२ व्या स्थानी आहे. भारतात २०१७ मध्ये अंडर १७ फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा होत आहे. गियानी यांनी वादाशी संघर्ष करीत असलेल्या फुटबॉलच्या वैश्विक संस्थेला नवीन युगात घेऊन जाण्याचे वचन दिले आहे. तथापि, त्यांच्यावर लवकरात लवकर प्रगतिकारक पाऊल उचलण्याचादेखील दबाव असेल. गियानी यांना शुक्रवारी फिफाचे नवीन अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. (वृत्तसंस्था)वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या माजी अध्यक्ष ७९ वर्षीय सॅप ब्लॅटर यांची ते जागा घेतील. दुसऱ्या फेरीच्या मतदानानंतर इनफैनटिनो यांना एकूण २०७ पैकी ११५ मते मिळाली. गियानी यांचे कडवे प्रतिस्पर्धी बहरीनचे शेख सलमान यांना ८८, तर जॉर्डनचे प्रिन्स अली यांना फक्त चार मते मिळाली.व्यवसायाने वकील असणाऱ्या गियानी यांनी फिफाला नव्या युगात घेऊन जाण्याचे वचन देताना म्हटले, ‘‘फिफा प्रतिकूल परिस्थितीतून गेला आहे; परंतु आता ती वेळ संपली आहे. भ्रष्टाचाराशी संघर्ष करणाऱ्या वैश्विक फुटबॉल संचालन संस्थेत आता नव्या युगाची सुरुवात झाली आहे.’’ त्यांनी २०२०पर्यंत फिफात काही बदल होण्याविषयी सांगितले.
भारतात फुटबॉलचा विकास करण्याची इच्छा
By admin | Published: March 01, 2016 3:05 AM