तिरुअनंतपुरम : महाराष्ट्राची जलपरी आकांक्षा व्होराला महिलांमध्ये; तर केरळचा जलतणपटू साजन प्रकाशला पुरुष गटात ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू घोषित करण्यात आले. १४ दिवस चाललेल्या या स्पर्धेत देशातील ९ हजार खेळाडूंनी ४१२ विविध क्रीडाप्रकारांत १,३६३ पदकांसाठी एकमेकांविरुद्ध झुंज दिली. आकांशा महाराष्ट्रात परतल्यामुळे तिच्या वतीने पुरस्कार महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे व पथकप्रमुख अॅड. धनंजय भोसले यांनी स्वीकारला. ला रांची येथे २०११ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. महाराष्ट्राला या स्पर्धेत ३० सुवर्ण, ४३ रौप्य व ५० कास्यपदके जिंकून चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. शनिवारी सायंकाळी झालेल्या समारोपात सहभागी सर्व खेळाडूंनी एकत्रित संचलन केले. संचलनाचा पहिला मान यजमान केरळ संघाला मिळाला. चौदा दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पेटविण्यात आलेली क्रीडाज्योत विझविण्यात आली. समारोपाच्या घोषणेनंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा ध्वज उतरवून पुढील स्पर्धा आयोजन करणाऱ्या गोवा राज्याच्या प्रतिनिधींकडे सोपविण्यात आला. कार्यक्रमासाठी केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल, केरळचे राज्यपाल, निवृत्त न्यायाधीश पी. सदाशिवम, केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी, भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे पदधिकारी आणि केरळसह देशातील आजी-माजी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते. (वृत्तसंस्था)
महाराष्ट्राची आकांक्षा; तर केरळचा साजन सर्वोत्कृष्ट खेळाडू
By admin | Published: February 16, 2015 2:44 AM