मुंबई : ऑलिम्पिक पदके भारतात यावी, यासाठी केंद्र सरकार मोठा निधी खर्च करताना दिसत आहे. आता तर खेळाडूंना ऑलिम्पिकच्या तयारीसाठीही चांगले पैसे मिळतात. एखाद्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक जिंकले तर त्याच्यावर फक्त शुभेच्छांचा वर्षाव होतो असे नाही तर करोडोंची रोख पारितोषिकं आणि भेटवस्तू मिळतात. नोकऱ्यांनी ऑफर येते. देश अगदी डोक्यावर घेऊन मिरवत असतो. पण दोन ऑलिम्पिक पदके पटकावणाऱ्या एका खेळाडूवर मात्र चक्क रस्त्यावर पाणीपुरी विकण्याची वेळ आलेली आहे.
ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावल्यावर देशातील लोकांच्या गळ्यातील ताइत हे खेळाडू होतात. त्यांचे मोठे सत्कार होतात. राष्ट्रपती, पंतप्रधान त्यांची भेट घेतात. केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्यावर पारितोषिकांची खैरात करते. पण एक भारताची महिला खेळाडू अशी आहे की, एका ऑलिम्पिकमध्ये चक्क दोन पदके जिंकून तिच्यावर खेळ सोडण्याची वेळ आली आहे.
तिच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. वडिल रस्त्यावर पाणीपुरीचा व्यवसाय करायचे. दिवसा किती पैसे मिळतील, माहिती नाही. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. पण तरीही देशाचे नाव उंचावण्याचे स्वप्न तिने आपल्या उराशी बाळगले. कसलीही मदत मिळत नव्हती. पण तरीही तिने जिद्द सोडली नाही. राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी करत तिने थेट ऑलिम्पिकसाठी प्रवेश मिळवला, तरीही तिची दखल कोणी घेतली नाही. ऑलिम्पिक पदक जिंकल्यावर तरी आपली दखल घेतली जाईल, असे तिला वाटले होते. पण एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके पटकावल्यावरही तिच्या पदरी रस्त्यावर पाणीपुरी विकण्याचीच वेळ आल्याचे पाहायला मिळत आहे.
अथेन्स येथे २०११ साली विशेष ऑलिम्पिक भरवण्यात आले होते. या विशेष ऑलिम्पिकमध्ये भारताच्या एका खेळाडूने चक्क दोन पदके पटकावली. अॅथलेटीक्समध्ये २०० मीटर आणि ४ बाय ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये मध्य प्रदेशच्या सीता साहुने कांस्यपदकांची कमाई केली. पण साधे कौतुक तर सोडा, पण सध्या तिच्यावर रस्त्यावर पाणीपुरी विकण्याची वेळ आली असून तिने खेळ सोडून दिला आहे.