अँटिग्वॉ : आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या वन डेत आज शुक्रवारी कमकुवत वेस्ट इंडिजला पुन्हा एकदा धूळ चारून २-० ने विजयी आघाडी घेण्याच्या निर्धारासह मैदानात उतरणार आहे. सर विव्हियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार सामना सायंकाळी ६.३० पासून खेळला जाईल. पोर्ट आॅफ स्पेनचा दुसरा सामना भारताने १०५ धावांनी जिंकला तर पहिला सामना ३९ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसामुळे रद्द करावा लागला होता. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताच्या तीन आघाडीच्या फलंदाजांनी दमदार फटकेबाजी केल्यानंतर गोलंदाजांनी देखील अचूक मारा करीत वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय मिळवून दिला होता. भारताने ५ बाद ३१० धावा उभारल्या पण त्यात धोनी आणि युवराजचे योगदान नव्हते. तिसऱ्या सामन्यात या दोघांकडून धावांची अपेक्षा असेल. युवा अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि केदार जाधव यांच्या उपस्थितीमुळे फलंदाजी आणखी भक्कम मानली जाते. आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विन हा देखील चांगली फलंदाजी करू शकतो. गोलंदाजीचा भार भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांच्या खांद्यावर असून फिरकीची जबाबदारी अश्विनसोबत कुलदीप यादव सांभाळणार आहे. (वृत्तसंस्था)संघ यातून निवडणार-भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराजसिंग, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पांड्या, रविचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, उमेश यादव, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, महंमद शमी, रिषभ पंत.वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), सुनील एम्ब्रिस, देवेंद्र बीशू, रोस्टन चेज, मिगुएल कमिन्स, केली होप, शाय होप, अल्जारी जोसेफ, एव्हिन लुईस, जेसन महंमद, अॅश्ले नर्स, किरोन पॉवेल, रोवमॅन पॉवेल.स्थळ : सर विव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, अँटिग्वॉसामन्याची वेळ : सायं. ६.३० वा.
भारताचा विजयी आघाडीचा निर्धार
By admin | Published: June 30, 2017 1:04 AM