नवी दिल्ली : विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेता विकास कृष्ण (७५ किलो) आणि शिव थापा (६० किलो) यांची १ एप्रिलपासून बँकॉकमध्ये होणाऱ्या थायलंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघात ससात भारतीय बॉक्सर्सचा समावेश आहे. गेल्या वर्षी रिओ आॅलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर विकास प्रथमच स्पर्धेत सहभागी होत आहे. विकास २०११ च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. गेल्या वर्षी एआयबीएच्या वार्षिक पुरस्कार समारंभात सर्वोत्तम बॉक्सर्सचा पुरस्कार पटकावणारा २४ वर्षीय विकास अमेरिकेतून परतल्यानंतर अलीकडेच राष्ट्रीय शिबिरात दाखल झाला. आशियाई स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता हा बॉक्सर गेल्या तीन महिन्यांपासून प्रशिक्षण घेत होता. त्याने या वर्षाच्या अखेरपर्यंत व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. माजी आशियाई चॅम्पियन शिवने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बँथमवेट (५६ किलो) वरच्या वजन गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत त्याला या वजन गटात संमिश्र यश मिळाले आहे. आसामच्या या बॉक्सरने ६० किलो वजन गटात राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. पण गेल्या महिन्यात बुल्गारियामध्ये ६८ व्या स्ट्रानद््जा स्मृती स्पर्धेत त्याला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. राष्ट्रीय स्पर्धेतील रौप्यपदक विजेता एल. देवेंद्रो सिंग (५२ किलो) आपल्या नव्या वजन गटात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार आहे. देवेंद्रोही आशियाई स्पर्धेत रौप्यपदक विजेता आहे. संघातील अन्य एक सदस्य श्याम कुमारने (४९ किलो) किंग्स कप नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्पर्धेत २०१५ मध्ये सुवर्णपदक पटकावले होते. बँथमवेट वजन गटात मोहम्मद हुसामुद्दीनचा समावेश आहे. त्याने गेल्या महिन्यात बुल्गारियामध्ये रौप्यपदक पटकावले होते. अनुभवी बॉक्सर मनोज कुमारची वेल्टरवेट (६९ किलो) गटासाठी निवड झाली आहे.
भारतीय बॉक्सिंग संघात विकास, शिवचा समावेश
By admin | Published: March 13, 2017 3:36 AM