बँकॉक : आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या एल. देवेंद्रो सिंह, शिव थापा आणि विकास कृष्णा यांनी आपापल्या वजन गटात प्रतिस्पर्धांचा पराभव करुन उपांत्यफेरीतील आपली जागा निश्चित केली. गत आशियाई स्पर्धेतील रौप्यपदकविजेत्या देवेंद्रो सिंह याने ४९ किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या कोर्नेलिस कवांगु लांगु याला ३-० ने पराभूत करीत पुढील फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत त्याची लढत उझबेकिस्तानच्या हसनबाय दुस्तमातोव याच्याशी होईल. या यशामुळे येत्या आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी देवेंद्रो पात्र ठरला आहे. ही विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी होणाऱ्या रियो आॅलिम्पिकची पात्रता फेरी असेल. ५६ किलो वजन गटात शिव थापाने किर्गीस्तानच्या ओमुरबेक मालबेकोव्हचा २-१ गुणांनी पराभव केला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील माजी कांस्यपदक विजेता विकास कृष्णाने ७५ किलो गटात व्हिएतनामच्या डिन होंग तुरोंगला ३-० गुणांनी नमविले. राष्ट्रीय प्रशिक्षक गुरबक्षसिंह संधू म्हणाले, उपांत्यपूर्व फेरीत देवेंद्रो याने सुरेख खेळ केला. सुरुवातीपासूनच त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूवर दबाव निर्माण केला. तसेच आक्रमक भूमिका स्वीकारत लांगु याला बचावात्मक पवित्रा घ्यायला भाग पाडले. त्याशिवाय त्याच्या बचावात्मक नीतीला भेदत त्याने विजयश्री मिळविली. आता पुढील फेरीत त्याची लढत तगड्या खेळाडूशी आहे. मात्र सध्याचा त्याचा खेळ पाहता हे आव्हान तो चांगल्या पद्धतीने स्वीकारेल. (वृत्तसंस्था)
देवेंद्रो, शिव, विकास कृष्णा उपांत्यफेरीत
By admin | Published: September 01, 2015 10:09 PM