- सुनील गावसकर लिहितो़भुवनेश्वरकुमार हा असा एक खेळाडू आहे, जो बोलण्यापेक्षा करुन दाखवण्यावर विश्वास ठेवतो. कानपूरमध्ये झालेल्या ऐतिहासिक पाचशेव्या कसोटीतून विनाकारण वगळल्यामुळे डिवचल्या गेलेल्या भुवीने कोलकाता कसोटीत बळींचा पंचकार मिळवताना स्वत:ला सिध्द केले आहे. आॅगस्ट महिन्यात वेस्ट इंडीजविरुध्दच्या पहिल्या दोन कसोटीत त्याला राखीव बेंचवर बसावे लागले. तिसऱ्या कसोटीत संधी मिळताच त्याने पाच बळी घेतले होते, चौथी कसोटी पावसामुळे अनिर्णीत राहिली. त्यामुळे कानपूर कसोेटीत त्याला वगळण्यासारखे काहीच कारण नव्हते. तरीही तो बाहेर राहिला. पण कोलकातात संधी मिळताच त्याने आपले अंतिम अकरातील स्थान का अढळ आहे, हे दाखवून ते भारताला वर्चस्व मिळवून दिले. तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात यष्टीरक्षक वृध्दीमान साहाने पुन्हा एकदा धीरोदात्त प्रदर्शन करीत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या फलंदाजीमुळे भारताच्या खात्यात अपेक्षित धावा जमा झाल्या. साहा, अश्विन आणि जडेजा यांच्यामुळे फलंदाजीला डेप्थ मिळाली आहे, कोणत्याही कर्णधारासाठी ही आनंदाची गोष्ट ठरेल. भारताची आघाडी फळी अजून म्हणावी तशी तळपलेली नाही. चेतेश्वर पुजारा हा भुवनेश्वरसारखाच आपल्या बॅटने बोलणारा फलंदाज आहे. त्याची अजिंक्य रहाणेसोबतची भागीदारीमुळे भारताची आपत्कालीन परिस्थितीतून सुटका झाली. दोघांची शतके मात्र हुकल्यामुळे थोडी रुखरुख लागून राहीली. त्यांनी ज्या कठीण परिस्थितीत फलंदाजी केली ते पाहता ते शतकाचे हक्कदार होते असे वाटते. ईडन गार्डनचे अनेक वर्षे क्युरेटर राहिलेल्या प्रबीर मुखर्जी यांच्या धाटणीची ही खेळपट्टी नाही. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अजिबात सोपे नाही. येथे चेंडु टेनिसबॉल सारखा बाउन्स होत आहे. अशा खेळपट्टीवर फलंदाजाने स्वत:ला कधीही सेट झालोय असे समजू नये. नेहमी सतर्क रहावे. उद्या सकाळी पाहुण्या संघाचा डाव लवकर गुंडाळून विजयासाठी जास्तीत जास्त लीड मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. भारतीय गोलंदाजांनी घेतलेल्या श्रमाचे चीज करण्याची जबाबदारी फलंदाजांची असेल. (पीएमजी)
डिवचलेल्या भुवनेश्वरने स्वत:ला सिद्ध केलं
By admin | Published: October 02, 2016 12:28 AM