ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - विजयानंतर प्रश्न निर्माण होत नसतात, प्रश्न निर्माण होतात ते पराभवानंतर. सध्या सुरु असलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ जिंकत असल्यामुळे धोनीची संघनिवड आणि रणनितीवर अजूनही कडाडून टीका झालेली नाही. धोनीला विजयी संघ कायम ठेवून खेळायला आवडत असले तरी, त्या संघातील काही खेळाडूंना वारंवार संधी देऊनही ते निष्प्रभ ठरत असतील तर संघामध्ये बदल करायला नको ?.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजयात सांघिक योगदानापेक्षा विराट कोहलीचे योगदान सर्वाधिक आहे. या वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना सातत्याने अपयशी ठरत आहेत. या तिघांना एकाही सामन्यात मोठी आणि विजयाची पायाभरणी करणारी खेळी करता आलेली नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतका अनुभव गाठीशी असणा-या रोहित शर्माकडून भरपूर अपेक्षा आहेत. मात्र आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये त्याने आपली विकेट फेकल्याचे दिसले आहे. रोहितने वर्ल्डकपच्या चार सामन्यांमध्ये फक्त ४५ धावा केल्या आहेत. विराट आणि शिखरने एकाही सामन्यात दणदणीत सलामी दिलेली नाही. शिखरने वर्ल्डकपमध्ये फक्त ४३ तर, रैनाने ४१ धावा केल्या आहेत. हे तिघे झटपट बाद होत असल्यामुळे मधल्याफळीतील फलंदाजांवर दबाव वाढत आहे.
विजयी संघ न बदलण्याच्या धोनीच्या ह्ट्टामुळे एखादा दिवस खराब असेल तर, संघ अडचणीत सापडू शकतो. सुरेश रैनाच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी द्यावी असे क्रिकेट विश्लेषकांचे मत आहे. धोनीकडे युवराज सारखा चांगला फिरकी गोलंदाज असूनही त्याने त्याचा वापर केला नव्हता.
अखेर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात संधी मिळताच युवराजने आपली उपयुक्तता सिद्ध करुन दाखवली. त्याने आपल्या पहिल्याच षटकात कर्णधार स्टीव्हन स्मिथलाच तंबूची वाट दाखवली होती.