नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघात आश्चर्यकारकरीत्या पुनरागमन करणाऱ्या सलामीवीर गौतम गंभीरमुळे कोलकाता येथे ३० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शिखर धवनला अंतिम संघात स्थान मिळणे कठीण झाले आहे.सलामीवीर लोकेश राहुल जखमी झाल्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध उर्वरित दोन कसोटींसाठी गौतम गंभीर याची निवड करण्यात आली आहे. गंभीरला ज्या प्रकारे संघात स्थान मिळाले आहे, त्यावरून त्याला अंतिम अकरामध्ये नक्की स्थान मिळेल.न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवड करताना गौतम गंभीरच्या नावाचा विचार करण्यात आला नव्हता. मात्र, शिखर धवन हा सलामीला आणखी एक पर्याय उपलब्ध असताना गंभीरची संघात निवड करण्यात आल्यामुळे त्याला अंतिम संघात स्थान देण्यात येईल. धवन व गंभीर दोघेही डावखुरे फलंदाज असून, दोघेही रणजी स्पर्धेत दिल्लीचे प्रतिनिधित्व करतात. भारतीय संघाचा कर्णधारही दिल्लीचेच प्रतिनिधित्व करीत असून, तो आता या दोघांपैकी कोणाला संधी देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.गंभीरने भारताकडून ५६ कसोटींत प्रतिनिधित्व केले असून, ४०४६ धावा केल्या आहेत. त्याने शेवटची कसोटी २०१४ मधये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. कधी काळी वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर ही जोडी सर्वाधिक यशस्वी मानली जात होती. गंभीर व सेहवागने कसोटीमध्ये ४४१२ धावा केल्या आहेत. भारताकडून सलामीला केल्या गेलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.शिखरचा खराब फॉर्मच त्याला कोलकाता कसोटीत बाहेर बसायला लावेल. वेस्ट इंडीजविरुद्ध शिखरने ८४ धावांची सुंदर खेळी केली होती. मात्र, त्यानंतर तीन डावांत २७, १, २६ अशा धावा केल्या. दुलीप करंडक स्पर्धेतही त्याला आपली छाप पाडता आली नाही. दुसरीकडे गौतम गंभीरने दुलीप करंडकमध्ये पाच डावांत ७१.२० च्या सरासरीने ३५६ धावा करीत इंडिया ब्ल्यूला विजेतेपद मिळवून दिले. त्याच्या या कामगिरीमुळेच त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत. (वृत्तसंस्था)
गंभीरच्या समावेशामुळे धवनचे स्थान धोक्यात
By admin | Published: September 29, 2016 4:29 AM