ढाका : महेंद्रसिंह धोनी ‘ब्रेक’नंतर गुरुवारपासून बांगलादेशविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. एकमेव कसोटी सामन्यानंतर भारतीय वन-डे संघात आठ नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे. धोनीव्यतिरिक्त स्टुअर्ट बिन्नी, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, सुरेश रैना, मोहित शर्मा, धवल कुलकर्णी आणि अंबाती रायडू बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सोमवारी भारतीय संघाच्या तंबूत दाखल झाले. पावसामुळे गाजलेल्या व रविवारी संपलेल्या एकमेव कसोटी सामन्यात यजमान संघाला फॉलोआॅन स्वीकारण्यास भाग पाडताना भारतीय संघाने या लढतीत मानसिकदृष्ट्या वर्चस्व गाजवले. भारतीय संघाला वन-डे मालिकेतही चमकदार कामगिरीची आशा आहे. कसोटी संघात समावेश असलेले काही खेळाडू मायदेशी परतले आहेत. भारतीय संघाचे व्यवस्थापक विश्वरूप डे यांनी सांगितले, की मायदेशी परतणाऱ्या खेळाडूंना निरोप देण्यात आला. भारतीय संघाने सोमवारी रात्री बाहेर वेळ घालवण्याचा निर्णय घेतला होता. काही खेळाडू मायदेशी परतणार असल्यामुळे आम्ही कसोटी सामन्यातील चमकदार कामगिरीचा आनंद एकत्र साजरा करण्याचा निर्णय घेतला होता, असे संघाच्या नजीकच्या सूत्राने सांगितले. भारताने एकमेव कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ४६२ धावांची मजल मारली. त्यानंतर प्रत्युत्तरात खेळणाऱ्या बांगलादेशचा पहिला डाव २५६ धावांत गुंडाळत त्यांना फॉलोआॅन स्वीकारण्यास भाग पाडले. वन-डे सामन्यांचे आयोजन मीरपूरमध्ये १८,२१ व २४ जून रोजी करण्यात येणार आहे. मॉन्सूनमुळे प्रत्येक लढतीसाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आलेला आहे. भारताने यापूर्वी बांगलादेशमध्ये २०१४ मध्ये वन-डे मालिका खेळली होती. त्या वेळी सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २-० ने विजय मिळवला होता, तर तिसरा व अखेरचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. (वृत्तसंस्था)
‘धोनी अॅण्ड कंपनी’ वन-डे मालिकेसाठी सज्ज
By admin | Published: June 17, 2015 2:10 AM