ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 3 - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की आपण फक्त एक उत्तम क्रिकेटर नसून माणूस म्हणूनही उत्तम आहोत. झारखंडमध्ये विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी आलेल्या महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा आपण माणूस म्हणून आपला मोठेपणा सिद्ध केला आहे.
विजय हजारे ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनी आपल्या मित्रांसोबत ड्रेसिंग रुममध्ये विजय साजरा करत होता. त्यावेळी अचानक त्याची नजर एका चेह-यावर जाऊन थांबली. रेल्वेत नोकरी करत असताना ओळख झालेल्या आपल्या या मित्राला ओळखण्यात धोनीला क्षणाचाही वेळ लागला नाही. धोनीने लगेच आपल्या मित्राची गळाभेट घेतली आणि आपल्यासोबत रात्री हॉटेलमध्येच डिनर करण्याचं आमंत्रण देऊन टाकलं.
धोनीच्या या मित्राचं नाव आहे थॉमस, जो खडगपूरमध्ये चहाची टपरी चालवतो. थॉमसने सांगितलं की, 'जेव्हा धोनी खडगपूरमध्ये रेल्वे स्थानकात नोकरी करत होता, तेव्हा दिवसातून दोन ते तीन वेळा तो चहा पिण्यासाठी आपल्या टपरीवर यायचा. अनेकदा तो दूध पिण्यासाठीही यायचा'. धोनीने यानिमित्ताने आपल्या खडगपूरमधील इतर मित्रांनाही जेवणाचं आमंत्रण पाठवलं. धोनीसोबत डिनर केल्यानंतर थॉमसने सांगितलं की, 'धोनीसोबत एकत्र जेवल्याने आपल्याला खूप आनंद झाला असून जेव्हा मी परत खडगपूरला जाईन तेव्हा दुकानाचं नान 'धोनी टी स्टॉल' ठेवणार आहे'.