नवी दिल्ली : भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानावर आणि मैदानाबाहेर कायम चर्चेत असतो. यावेळी तो वेगळ्याच चर्चेत आला असून, धोनीचे आॅस्टे्रलियाच्या एका क्रीडा साहित्य तयार करणाऱ्या कंपनीने तब्बल २० करोड रुपये बुडवले असल्याचे वृत्त आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आॅस्टे्रलियातील स्पार्टन स्पोटर््स या कंपनीने धोनीसह तीन वर्षांपूर्वी १३ करोडहून अधिक रुपयांचा प्रायोजक करार केला होता. याव्यतिरीक्त बॅटचाही करार करण्यात आला होता. या सर्व करारामुळे धोनीला यातून तब्बल २० करोडहून अधिक रुपयांची घसघशीत कमाई होणार होती. मात्र, आता ही आॅस्टे्रलियन कंपनी आपल्या अटी पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, धोनीच्या व्यवस्थापकीय कंपनीने दिलेल्या माहितीनुसार स्पार्टनने २०१३ सालापासून मार्च २०१६ पर्यंत कराराच्या २० करोडपैकी केवळ चार हप्ते दिले. त्यात हे हप्ते किती रुपयांचे होते हे स्पष्ट नाही. धोनीच्या व्यवस्थापकीय कंपनीचे प्रमुख अरुण पांडे यांनी सांगितले की, आम्ही लवकरच हा वाद सोडविण्याचा प्रयत्न करू.’’ विशेष म्हणजे या आॅस्टे्रलियन कंपनीविरुद्ध धोनीची कंपनी कायदेशीर पाऊल उचलण्याची चर्चाही समोर येत आहे. (वृत्तसंस्था)
धोनीला तब्बल २० करोडची ‘गुगली’
By admin | Published: July 16, 2016 2:36 AM