ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतरही महेंद्रसिंग धोनीवरील चाहत्यांचं प्रेम काही कमी झालेलं नाही. अशीच एक घटना विजय हजारे ट्रॉफीच्या उप-उपांत्य सामन्यादरम्यान पाहायला मिळाली. धोनी फलंदाजी करत असताना एक चाहता धोनीची सही घेण्यासाठी थेट मैदानावर आला. त्यावेळी धोनी फलंदाजी करत होता. अशा घटना क्रिकेटमध्ये कधीतरीच पाहायला मिळतात.
झारखंड विरूद्ध विदर्भाच्या सामन्यात फलंदाजी करताना धोनी नॉन-स्टाइकला होता. अचानक एक चाहता सुरक्षारक्षकांना चकवत धोनीजवळ आला. त्याने धोनीच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याने धोनीकडे सही मागितली. धोनीनेही त्याला निराश केलं नाही आणि सामना सुरू असताना धोनीने त्याला सही दिली. त्यानंतर त्या चाहत्याचा आनंद गगनात मावत नव्हाता, त्यानंतर तो परतला.
जावेनारी महिन्यातही भारत अ आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या सराव सामन्यातही एक चाहता धोनीला भेटायला मैदानात आला होता. एकदा कसोटी सामन्यादरम्यान अब्बास अली बेग यांना एका चाहत्याने किस केलं होतं तर एखदा सुरक्षा रक्षकांचं कडं चुकवून एक चाहता सौरव गांगुलीच्या पाया पडण्यासाठी मैदानात पोहोचला होता.
यापुर्वी काही दिवसांपूर्वी धोनी आपल्या मित्रांसोबत ड्रेसिंग रुममध्ये विजय साजरा करत होता. त्यावेळी अचानक त्याची नजर एका चेह-यावर जाऊन थांबली. रेल्वेत नोकरी करत असताना ओळख झालेल्या आपल्या या मित्राला ओळखण्यात धोनीला क्षणाचाही वेळ लागला नाही. धोनीने लगेच आपल्या मित्राची गळाभेट घेतली आणि आपल्यासोबत रात्री हॉटेलमध्येच डिनर करण्याचं आमंत्रण देऊन टाकलं. धोनीच्या या मित्राचं नाव थॉमस, जो खडगपूरमध्ये चहाची टपरी चालवतो. 'जेव्हा धोनी खडगपूरमध्ये रेल्वे स्थानकात नोकरी करत होता, तेव्हा दिवसातून दोन ते तीन वेळा तो चहा पिण्यासाठी आपल्या टपरीवर यायचा,असं थॉमसने सांगितलं.