चेन्नई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वकौशल्यातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तसेच, सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत कर्णधारपद सोपविण्यात आलेल्या विराट कोहलीमध्येही कोणतीच कमतरता नाही. धोनीकडून जबाबदारी स्वीकारण्याची ही कोहलीसाठी योग्य वेळ आहे, असे मत भारताचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विनने मांडले. प्रसारमाध्यमांशी बोलताना आश्विनने म्हटले की, ‘माझ्या मते एक खेळाडू म्हणून धोनी संघासाठी उपलब्ध असेल. ही चांगली गोष्ट आहे. कर्णधार म्हणून त्याची कारकीर्द अद्भुत व शानदार होती. एक कर्णधार म्हणून धोनीकडून खूप काही शिकता येईल. इतकंच नव्हे, तर मोठ्या पदावर नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींनाही त्याच्याकडून शिकता येईल.’कोहलीच्या पुढील नेतृत्वाबाबत आश्विन म्हणाला की, ‘हा रोमांचक प्रवास होणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत एकत्रितपणे कठोर परिश्रम करण्यासारखे आहे. विराट सल्ले मागणारा खेळाडू आहे. कोहलीमध्ये कोणतीही कमतरता नाही. जर तुम्ही त्याच्या एक वर्षापूर्वीच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकल्यास सर्वकाही स्पष्ट होईल. हे पाहूनच माझ्या मते धोनीने कोहलीकडे जबाबदारी देण्याचा विचार केला असावा.’धोनीच्या निर्णयाविषयी आश्विन म्हणाला की, ‘हा वैयक्तिक निर्णय आहे. हे व्यावसायिक विश्व असून, मी यावर काहीही सूचित करू शकत नाही. कधीना कधी आपल्याला या वेळेचा सामना करावयास लागणार होता, हा निर्णय संपूर्णपणे त्याचा आहे, आणि आपण धोनीच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा.’ (वृत्तसंस्था)
धोनीकडून खूप काही शिकण्यासारखे : अश्विन
By admin | Published: January 07, 2017 4:35 AM