नागपूर : रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नागपूरच्या व्हीसीए स्टेडियममध्ये गुजरातच्या आव्हानाला सामोरे जात असलेल्या झारखंड संघाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी दाखल झाला आहे. झारखंडने या स्पर्धेत प्रथमच उपांत्य फेरी गाठली आहे. खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्यासाठी झारखंड संघाचा अनधिकृत मेंटर असलेला धोनी रविवारी विशेष विमानाने नागपुरात दाखल झाला आणि रविवारी पहिल्या दिवशी उपाहारापूर्वी थेट स्टेडियममध्ये पोहोचला. उपाहार आणि चहापानाच्या ब्रेकमध्ये त्याने खेळाडूंसोबत वेळ घालविला. झारखंडचा कर्णधार सौरभ तिवारीसोबत त्याने चर्चा केली. धोनी येथे पोहोचला असल्याचे वृत्त पसरताच त्याच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये गर्दी केली. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा धोनी रणजी स्पर्धेत खेळत नसला तरी स्थानिक मोसमाला सुरुवात झाली तेव्हापासून धोनी झारखंड संघाचा एक भाग आहे. झारखंड संघाच्या यंदाच्या यशामध्ये धोनीची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. ड्रेसिंगरूममधील त्याची उपस्थिती आणि त्याने दिलेल्या टीप्स खेळाडूंसाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. धोनी या लढतीदरम्यान पूर्णवेळ नागपुरात राहण्याची शक्यता नाही. राष्ट्रीय संघात खेळत नसताना धोनी राज्य संघासाठी विशेष वेळ काढतो. राष्ट्रीय संघाचा कर्णधार राज्य संघासोबत सराव करीत असल्याचे चित्र विशेष अनुभवाला मिळत नाही, पण धोनीने मात्र वेळ मिळेल तेव्हा राज्य संघासोबत सराव केला आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
‘झारखंड’चे मनोधैर्य उंचावण्यासाठी धोनी नागपुरात
By admin | Published: January 02, 2017 12:36 AM