पणजी : वन डे क्रिकेटचा ‘माहीर’ कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनीवर माजी कर्णधार सौरव गांगुली याने आज स्तुतिसुमने उधळली. तो म्हणाला, ‘‘मर्यादित षटकांच्या स्पर्धेत धोनी इतक्या वर्षांपासून उत्कृष्टपणे जबाबदारी सांभाळत आहे, याचे कारण म्हणजे त्याच्यातील धैर्य आणि संयम. टीकाकारांचा धैर्याने सामना करीत तो पुढे जात आहे. दबाव त्याच्या चेहऱ्यावर कुठेच दिसत नाही. धोनीचा हा गुण वाखाणण्याजोगा आहे.’’असे असतानाही त्याच्यावर टीका का होते? यावर गांगुली म्हणाला, ‘‘हा खेळाचा एक भाग आहे. एवढ्या वर्षांपासून तो कर्णधार आहे. याची त्यालाही सवय झाली असेल. जेव्हा संघ जिंकतो, तेव्हा त्यांना डोक्यावर चढविले जाते आणि हरतो तेव्हा मात्र टीकेचा भडिमार होतो. हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. धोनीमध्ये दबावाच्या स्थितीत धैर्य कायम ठेवण्याची क्षमता आहे. त्याला ड्रेसिंग रूममध्ये मानसन्मान आहे. आम्ही मात्र त्याच्यावर झालेल्या टीकेकडे पाहतो. तो आतून वेगळा आणि बाहेरून खूप वेगळा आहे.’’प्रशिक्षकाच्या निर्णयावर...भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारणार का? यावर सौरव म्हणाला, ‘‘अशा प्रकारचा प्रस्ताव जरी आला तरी प्रशासकीय जबाबदारीमुळे मी त्याचा स्वीकार करू शकत नाही. माझ्याकडे अजून एक जबाबदारी आहे. मी कॅबच्या अध्यक्षाच्या रूपात हे काम करीत आहे. दोन्ही गोष्टी आपण एकाच वेळी करू शकत नाही.’’ पुढील प्रशिक्षक निवडण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यावर सौरव म्हणाला, ‘‘प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर या समितीचा उद्देश काय आहे, हेच माहीत नाही.’’
धोनी धैर्यवान! गांगुलीने उधळली स्तुतिसुमने
By admin | Published: February 04, 2016 3:47 AM