ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि, 23 - सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार आहे हे सर्वांनाच माहित आहे. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी बीसीसीआयकडे सचिनचे काही व्हिडीओ फुटेज मागितले होते. हे व्हिडीओ सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. पण बीसीसीआयकडून यास स्पष्ट नकार देण्यात आला आहे. त्यामुळे सचिनच्या बायोपिकसाठी निर्मात्यांना बीसीसीआयच्या व्हिडीओसाठी निश्चित दर भरावे लागणार आहेत. धोनीच्या बायोपिकसाठी दरांमध्ये कोणतीही तडजोड करण्यात आली नाही, तर सचिनसाठी बीसीसीआयने आपल्या नियमात बदल का करावा? असा सवाल एका वरिष्ठ अधिकाऱ्याने निर्मात्याला केला केला.सचिन : अ बिलियन्स ड्रीम्स या सचिनच्या जीवनावर आधारित बायोपिकसाठी नॉट आऊट 200 निर्मात्यांनी बीसीसीआयकडे त्याच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या क्षणांचे व्हिडीओ मागितले होते. यासाठी बीसीसीआयने सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावरील बायोपिकसाठी त्याचा बिझनेस पार्टनर अरुण पांडे यांनी काही व्हिडीओसाठी बीसीसीआयशी संपर्क साधला होता. यावेळी बीसीसीआयनं त्या व्हिडीओसाठी एक कोटी रुपये द्यावे लागतील हे स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे, माजी कर्णधार सौरभ गांगुलीलाही काही व्हिडीओंची गरज होती, तेव्हा त्यालाही बीसीसीआयकडून आकारण्यात आलेलं शुल्क भरावं लागलं. त्यामुळे सचिनसाठी नियमात बदल का करावा? असा सवाल बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने उपस्थित केला आहे.बीसीसीआयच्या व्हिडीओसाठी एक दर निश्चित करण्यात आले असून, सामन्यांचं महत्त्व लक्षात घेऊन हे दर निश्चित करण्यात आलेत. बीसीसीआयकडून व्हिडीओमधील प्रत्येक सेकंदानुसार दर आकारले जातात. पण सचिनच्या निवृत्तीवेळीच्या वानखेडे स्टेडिअमवरील 3 मिनिट 50 सेकंदाच्या भाषणाचा व्हिडीओ कोणतंही शुल्क न आकारता उपलब्ध करुन देण्यास बीसीसीआयनं सहमती दर्शवली असल्याचं समजत आहे.
दरम्यान, प्रत्येक क्रिकेटरच्या स्वप्नातील सचिन तेंडूलकरचा प्रवास सचिन अ बिलियन ड्रीम या त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातून पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटापूर्वी सचिन प्लेइंग विथ माय वे या आत्मचरित्राच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचला होता. त्याच्या आयुष्यातील अगदी महत्त्वाच्या गोष्टी पुस्तकाच्या माध्यमातून समोर आल्यानंतर देखील त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाबद्दल तमाम भारतीयांमध्ये उत्सुकता दिसून येते. नुकतेच सचिनने 100 एमबी हे अॅप लाँच केले आहे. या अॅपच्या माध्यामातून सचिन आपल्या चाहत्याशी कनेक्ट राहत आहे. जेम्स अर्सकाईन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित सचिन अ बिलियन ड्रीम या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून हा चित्रपट 26 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता मयुरेश पेम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा भाऊ नितीन तेंडुलकरची भूमिका साकारत आहे. या ट्रेलरमधील सचिनची काही वाक्यं अक्षरश: मनाचा ठाव घेणारी आहेत. क्रिकेट खेळणं हे माझ्यासाठी मंदिरात जाण्यासारखं होतं. असं म्हणत सचिननं या ट्रेलरमध्ये आपली क्रिकेटविषयी असणारी भावना व्यक्त केली आहे. या सिनेमात खुद्द सचिन तेंडुलकरनं भूमिका साकारली आहे. हा सिनेमा वास्तवावर बेतलेला असल्यानं याचा ट्रेलरही तसाच करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे. यात सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांची काही जुनी दृश्यही दाखवण्यात आली आहे.