रांची : भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा आम्रपाली ग्रुपचा ‘ब्रँड अम्बॅसिडर’ होता. यावर वाद होताच त्याने पदाचा राजीनामा दिला. हे प्रकरण शांत होत नाही तोच स्वत:च्या घरच्या स्विमिंग पूलवरून नव्या वादात धोनी अडकला आहे. धोनीच्या हरमू भागातील बंगल्यात असलेल्या स्विमिंग पूलमध्ये रोज १५ हजार लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याची तक्रार लोकांनी झारखंडचे महसूलमंत्री अमर कुमार बाऊरी यांच्याकडे केली. सध्या राज्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने हाहाकार माजला आहे. मंत्र्यांच्या जनता दरबारात ही तक्रार आली. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नसताना धोनीच्या स्विमिंग पूलमध्ये मात्र पाणी सतत भरलेले असते. धोनी फारच कमी वेळा स्वत:च्या घरी येतो. त्याच्या अनुपस्थितीत फार कमी लोक घरी वास्तव्यास असतात. या भागातील जनतेकडे कुणाचेही लक्ष नाही; पण स्विमिंग पूलसाठी मात्र १५ हजार लिटर पाण्याची व्यवस्था नियमितपणे केली जाते, असाही आरोप लोकांनी निवेदनात केला आहे.
स्विमिंग पूल वादात अडकला धोनी
By admin | Published: April 22, 2016 12:02 AM