नवी दिल्ली : आशिया चषक स्पर्धेपासून भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी भलत्याच फॉर्ममध्ये असून, त्याचा सध्याचा फॉर्म सर्वच गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणारा आहे. या स्पर्धेदरम्यान धोनीच्या बॅटमधून प्रत्येक ताकदवर शॉटचा मजबूत आवाज येत होता, तो आवाज टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतासाठी शुभसंकेत असल्याचे खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सांगितले. यातून धोनीची सकारात्मक मानसिकता दिसून येत असल्याचेही सचिन म्हणाला. गेल्या काही अनेक स्पर्धांतील खालावलेल्या फॉर्ममुळे धोनीच्या ‘क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम फिनिशर’ या लौकिकाला धक्का बसला होता. मात्र, आशिया चषकमधील काही तुफानी खेळीनंतर त्याने पुन्हा एकदा क्रिकेटजगताला आपली दखल घेण्यास भाग पाडले. प्रचंड दबाव झेलण्याची असलेली क्षमता ही धोनीची उजवी बाजू असून, यामुळेच तो चांगला कर्णधार बनला आहे. कित्येक वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर तो परिपक्व झाला आहे. तो तणावामध्येही नर्व्हस होत नाही, हे संघासाठी चांगले संकेत आहेत, असेही सचिनने सांगितले. (वृत्तसंस्था) विश्वातील कोणताही क्रिकेटपटू आपल्या कारकिर्दीमध्ये सतत चांगल्या फॉर्ममध्ये राहू शकत नाही; कारण तो मशिन नाही. ज्यावेळी धोनीच्या बॅटमधून निघणाऱ्या ताकदवर फटक्यांचा आवाज ऐकला, तेव्हा पटले की हा आवाज वेगळा आहे. यावरून फलंदाजाची बदललेली मानसिकता कळून येते.- सचिन तेंडुलकर
धोनीचे फटके शुभ संकेत
By admin | Published: March 15, 2016 3:22 AM