ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - भारतीय क्रिकेट संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी भारताच्या आतापर्यंतच्या यशस्वी कर्णधारांचा उल्लेख करताना माजी कर्णधार सौरव गांगुलीला अनुल्लेखाने मारले. सौरव गांगुलीला क्रिकेट वर्तुळात दादा म्हटले जाते मात्र शास्त्रींनी हेच शब्द धोनीसाठी वापरले.
धोनी भारतीय क्रिकेटमधला दादा कर्णधार आहे. मी बघितलेला धोनी सर्वोत्तम कर्णधार आहे. त्या दादा कर्णधाराला माझा सलाम. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक विजय मिळवले. कोणी त्याच्या जवळपासही पोहचू शकत नाही. तो असा कर्णधार आहे जो कधीही खुर्चीच्या मागे पळाला नाही. अन्यथा तो ऑस्ट्रेलियातील 90 व्या कसोटीनंतर निवृत्त झाला नसता असे शास्त्रींनी सांगितले.
धोनी कर्णधार असताना शास्त्री संघाचे संचालक होते. त्यावेळी त्यांनी 2019 चा वर्ल्डकप ध्यानात घेऊन निवड समितीने भविष्यातील नेतृत्वाचा कसा विचार करावा याविषयी मत मांडले होते. जे जिंकण्यासारखे होते ते सर्व धोनीने जिंकले. त्याला आता काहीही सिद्ध करायचे नाही असे शास्त्रींनी सांगितले.
रवी शास्त्री यांच्या सर्वोत्तम भारतीय कर्णधारांच्या यादीमध्ये कपिल देव दुस-या स्थानी आहे. त्यानंतर 1971 मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकणा-या भारतीय संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांचा क्रमांक लागतो. रवी शास्त्रीने टायगर अली पतौडी आणि सुनील गावस्कर हे सुद्धा सर्वोत्तम कर्णधार असल्याचे सांगितले. पण सौरव गांगुलबद्दल चकार शब्द काढला नाही.