अँटिग्वा : महेंद्रसिंह धोनीने १०० पेक्षा अधिक चेंडू खेळले आणि एकही चौकार किंवा षटकार लगावला नाही, असे ऐकताना आश्चर्य वाटते, पण रविवारी विंडीजविरुद्ध चौथ्या वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या माजी कर्णधाराने कारकिर्दीतील सर्वात संथ खेळी केली. धोनीने ११४ चेंडूंना सामोरे जाताना ५४ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट ४७.३६ होता. धोनीने कारकिर्दीत आतापर्यंत २९५ वन-डे सामने खेळले आहेत. ५० पेक्षा अधिक धावा फटकावताना त्याचा स्ट्राईक रेट ५० पेक्षा कमी असल्याचे कारकिर्दीत प्रथमच घडले आहे. धोनीने वन-डे क्रिकेटमध्ये ६४ अर्धशतके व १० शतके झळकावली आहेत. या ७४ डावांपैकी ३८ मध्ये त्याचा स्ट्राईक रेट १०० पेक्षा अधिक राहिला आहे. यापूर्वी ५० पेक्षा अधिक धावा फटकाविलेल्या डावामध्ये त्याचा सर्वात खराब स्ट्राईक रेट ६०.६७ होता. त्या वेळी त्याने २०१३ मध्ये कोलकाता येथे पाकिस्तानविरुद्ध ८९ चेंडूंना सामोरे जाताना ५४ धावा केल्या होत्या. धोनीने विंडीजविरुद्ध रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत १०३ ऱ्या चेंडूवर पहिला चौकार लगावला आणि १०८ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले.
धोनीची कारकिर्दीतील सर्वात संथ खेळी
By admin | Published: July 04, 2017 1:45 AM