नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेत सलग तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे धोनीच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी धोनीची पाठराखण केली आहे. धोनी हा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. एक वन-डे मालिका गमावल्यामुळे त्यांच्यावर टीका करणे योग्य नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. आॅस्ट्रेलियात झालेल्या तीनही वन-डे सामन्यांमध्ये भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभी केली होती. मात्र तरीही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला ही चिंतेची बाब आहे. याची समीक्षा होणे गरजेचे आहे. या सर्व सामन्यांमध्ये गोलंदाजांना प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापन आगामी बैठकीत योग्य निर्णय घेईल असेही ठाकूर यांनी सांगितले. वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची आॅस्ट्रेलियातील कामगिरी चिंताजनक आहे. मात्र संघ व्यवस्थापन संघाच्या चुकांचा अभ्यास करून त्या सुधारण्यासाठी योग्य पाऊल उचलतील अशी आहे, असेही ठाकूर म्हणाले. (वृत्तसंस्था)
ठाकूर यांच्याकडून धोनीची पाठराखण
By admin | Published: January 19, 2016 3:20 AM