टीसी ते कर्णधार... एमएसची यशोगाथा !महिनाभरापूर्वी एका प्रॉडक्शन हाऊसने महेंद्रसिंग धोनीवर चित्रपट काढण्याची घोषणा केली. नव्या दमाचा स्टार सुशांतसिंग राजपूत हा धोनीच्या भूमिकेसाठी स्वत:चे केस वाढवीत असल्याचे ऐकायला मिळाले. हा चित्रपट अर्थात आत्मचरित्र नाही तर तो क्रिकेटपटूचा प्रवास आहे. हा प्रवासही आगळावेगळा. मोठ्या शहरांची मक्तेदारी मोडित काढून लहानशा शहरातून आलेला हा खेळाडू कसोटीपटू बनला. रेल्वेत तिकीट निरीक्षक असलेला धोनी चक्क टीम इंडियाचा कर्णधारपदावर झेपावतो, ही बाबच थक्क करणारी आहे. धोनीचीही सुरुवात सामान्यासारखीच. मध्यमवर्गीय घरातला हा मुलगा वयाच्या २०व्या वर्षी रोजगाराच्या शोधार्थ खडगपूरला येतो. त्यावेळी द. पूर्व मध्य रेल्वेला यष्टिरक्षकाची गरज होती. धोनीची फलंदाजीची चाचणी घेण्यात आली व क्रीडा कोटाअंतर्गत नोकरीही लागली. पुढे पूर्व विभाग संघात त्याची निवड झाली खरी, मात्र कोलकाता येथे पोहोचण्यास उशीर झाल्याने दुलिप ट्रॉफीच्या सामन्यात त्याच्याऐवजी दीप दासगुप्ता याला संधी मिळाली. पण यश अधिक काळ दूर राहू शकत नाही. धोनीबाबत हेच घडले. स्थानिक क्रिकेटमधील धोनीची यशस्वी वाटचाल पुढे २००५ साली लंकेविरुद्ध कसोटी पदार्पणास पुरेशी ठरली.तो मुरब्बी कसोटीपटू नव्हताच. त्याची खेळाची तऱ्हा इतरांपेक्षा निराळीच. फलंदाजी आणि यष्टिरक्षणातील कौशल्यही वेगळेच! स्वत:मधील उणिवांवर मात करीत मात्र तो देशाचा सर्वांत सफल कर्णधार बनू शकला. कर्णधार या नात्याने त्याने २७ कसोटी जिंकल्या आहेत. पाचव्याच सामन्यात त्याची गाठ ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तरशी पडली; तरीही त्याने शतकी खेळी केली. धोनी डगमगला नाही. त्याची बॅट तळपली की पुढे कुठला गोलंदाज आहे याचेशी त्याचे सोयरसूतक नसायचे.‘ हेलिकॉफ्टर शॉट’ हे माहीच्या खेळाचे वैशिष्ट्य!धोनीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अधिक रस असला तरी त्याने कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरविणे टाळले. त्याऐवजी त्याने ‘डार्क नाईट सीरिज’च्या ब्रुस व्हायनचे अनुकरण केले. या प्रकारात खलनायक ठरण्याची त्याने प्रतीक्षा केली, असे म्हणता येईल. वयाच्या ३३ व्या वर्षी त्याच्या दाढीचे पांढरे केस बघितल्यानंतर भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविताना किती दडपण येते, याची कल्पना येते. उपखंडाबाहेर कर्णधार म्हणून अपयशी ठरल्यानंतर तो टीकेचे लक्ष्य ठरला. तो बचावात्मक पवित्रा स्वीकारीत असल्याची त्याच्यावर नेहमीच टीका झाली. हे जरी काही अंशी खरे असले तरी त्याने त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या पर्यायांचा वापर केला. आता कसोटी क्रिकेटमध्ये सेहवाग नाही आणि प्रतिस्पर्धी संघाचे शेपूट गुंडाळण्यासाठी अनिल कुंबळेही नाही. पूर्वीचा झहीरही संघात नाही. २००० च्या सुरुवातीची भारतीय संघातील प्रसिद्ध मधली फळीही नाही, तरी धोनीने प्रत्येक पराभवानंतर प्रसारमाध्यमांचे बाऊंसर लीलया टोलविले. त्यासाठी त्याने ‘कॅप्टन कुल’ची प्रतिमा जपताना प्रसंगी विनोदाचा सहारा घेतला.२०१४ मध्ये न्यूझीलंडमध्ये भारतीय पत्रकारांनी उपखंडाबाहेर वेगवान गोलंदाजांचा वापर का करीत नाही ? असा प्रश्न केला असता धोनीने त्याच्या शैलीत हा बाऊंसर परतविला. त्याने सांगितले की, ‘असे केले तर कर्णधाराला बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागेल किंवा पराभव स्वीकारावा लागेल.’ आकड्यांसोबत धोनीेचे वेगळे नाते होते. एकदा त्याने भारताचे तत्कालिन प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांना सांगितले होते की, ‘जर मी सुरुवातीचे १३ चेंडू खेळून काढले, तर मी भारतासाठी सामना जिंकून देणारच. भारतीय क्रिकेटमधील २०१३-१४ च्या मोसमात निराशाजनक कालखंड धोनीने अनुभवला. त्यावेळी दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. धोनीने मात्र पराभवामुळे खचून न जाता संघबांधणीसाठी मायदेशात खेळल्या जाणाऱ्या मालिकेची प्रतीक्षा केली. मायदेशात खेळल्या गेलेल्या मालिकेत युवा संघांचे मनोधैर्य उंचाविण्यास मदत झाली. धोनीने ९ वर्षांच्या कारकीर्दीत एकूण ९० कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केले. त्यात त्याने ६० कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व केले. आकड्याचा विचार करता यष्टिरक्षक म्हणून अॅडम गिलख्रिस्टने ९६ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे, पण धोनीने त्याचा विचार केला नाही. धोनी भारताचा कर्णधार म्हणून सर्वांधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडला. अंतिम कसोटी सामन्यात त्याने यष्टिरक्षक म्हणून ९ बळी घेतले, हा एक विक्रम आहे. यशापयशाचा धनी !मेलबोर्न : दोनदा विश्वचषकाचे जेतेपद, नंबर-१ टेस्ट रँकिंग, सर्वाधिक विजय आणि याउलट विदेशांत सर्वाधिक पराभव... महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाचा हा चढउतार असलेला आलेख आहे. संपूर्ण प्रवासात रांचीच्या या ३३ वर्षांच्या खेळाडूने गावातून येणाऱ्या खेळाडूंना मोठी स्वप्ने दाखविण्याची संधी उपलब्ध करून दिली. कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्त होण्याचा निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. धोनीचा हा निर्णय विराट कोहलीच्या नेतृत्वाचा मार्ग मोकळा करणारा आहे. २००७ च्या विश्वचषक टी-२० स्पर्धेपासून धोनीच्या नेतृत्वाचा प्रारंभ झाला. वन-डे आणि कसोटी क्रिकेटमध्यही त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने यशाच्या कमानी उभारल्या. दरम्यान, कसोटीत २००९ ते २०११ या काळात भारताने मोठी झेप घेतली. टी-२० चा विश्वचषक आणि २०११ साली २८ वर्षानंतर वन-डे विश्वचषक जिंकला.यानंतर राष्ट्रीय संघाने मैदानावर अनेक बदल अनुभवले. शिवाय आयपीएलच्या सहाव्या पर्वातील फिक्सिंग आणि बेटिंगमध्ये धोनीचे नाव गुंतले. त्याने ६० कसोटी सामन्यांत देशाचे नेतृत्व केले. त्यात २७ विजय आणि १८ पराभव झाले. १४ सामने अनिर्णित राहिले. त्याच्या नेतृत्वात भारताने विदेशात सहा सामने जिंकले, तर १५ गमावले. त्याच्या सर्वोच्च धावा आहेत २२४. कर्णधार या नात्याने त्याची पाच शतके आहेत. धोनीचे कसोटी रेकॉर्ड पाहिले तर त्यांने ९० सामन्यांत ४८७६ धावा केल्या. त्याची सर्वोच्च खेळी आहे, २२४ धावा. सहा शतके आणि ३३ अर्धशतके धोनीच्या खात्यात जमा आहेत. कॅप्टन कूल नावाने ख्यातिप्राप्त असलेला धोनी सचिन तेंडुलकरपाठोपाठ सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सचिनला त्याने मागे टाकले; पण यात वेगळी बाब अशी की धोनी, हा नेहमीच मीडियापासून अलिप्त राहिला आहे. (वृत्तसंस्था)धोनीने विचारपूर्वक निर्णय घेतला : संजय पटेलनवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनीने कसोटीतून निवृत्तीचा घाईत निर्णय घेतल्याचे अनेक खेळाडूंनी म्हटले असले तरी धोनीचा हा निर्णय घाईगडबडीत नव्हे, तर विचारपूर्वकच घेतला आहे, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांनी व्यक्त केले आहे़ पटेल यांनी धोनीसोबत काय चर्चा झाली याबद्दल विस्तृत माहिती दिली नाही; मात्र पटेल यांनी सांगितले की, तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर धोनीने टेलिफोन केला आणि कसोटीतून निवृत्तीची इच्छा व्यक्त केली़ तेव्हा दुखापत झाली किंवा अन्य कारण आहे का असा प्रश्न केला, तेव्हा धोनी म्हणाला, मला दुखापत वैगेरे झालेली नाही़ क्रिकेटच्या भल्यासाठी मी हा निर्णय घेत आहे़ पटेल म्हणाले, धोनीकडे हा निर्णय अंतिम असल्याची विचारणा केली, तेव्हा तो म्हणाला, निर्णय अंतिम आहे; मात्र तत्पूर्वी मी खेळाडूंना याबद्दल माहिती देतो़ त्यानंतर तुम्ही निर्णय जाहीर करा़ यानंतर काही वेळाने पुन्हा धोनीने पटेल यांच्याशी संपर्क साधला़ तेव्हा बीसीसीआयने याबद्दल अधिकृतरित्या धोनी निवृत्त झाल्याची घोषणा केली़माजी क्रिकेटपटंूना धोनीच्या निर्णयाचे आश्चर्यमुंबई : भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू चंदू बोर्डे, अजित वाडेकर आणि दिलीप वेंगसरकर यांनी महेंद्रसिंह धोनीच्या कसोटीतील निवृत्तीच्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले आहे़ माजी कर्णधार वेंगसरकर म्हणाले, धोनीने अचानक कसोटीतून निवृत्ती घेतली, याचे आश्चर्य आहे़ कारण हा खेळाडू आणखी १ ते २ वर्षे कसोटीतून खेळू शकत होता़ विशेष म्हणजे त्याने फिटनेस कायम राखला आहे़ त्यामुळे तो यापुढेही सहज खेळू शकला असता़ चंदू बोर्डे म्हणाले, धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतल्याचा निर्णय धक्कादायक आहे़ यापूर्वी तो हा निर्णय घेऊ शकत होता; मात्र, असे असले तरी सध्या पुढच्या व्यक्तीच्या हातात संघाची धुरा सोपविण्यासाठी त्याला हीच वेळ योग्य वाटली असावी़ अजित वाडेकर म्हणाले की, धोनीने ही मालिका संपेपर्यंत वाट बघायला हवी होती़ विशेष म्हणजे पहिल्या कसोटीतही तो खेळू शकला नव्हता़ अशा परिस्थितीत त्याचा निर्णय धक्कादायक आहे़ मात्र, विदेशात कर्णधार म्हणून त्याला विशेष कामगिरी करता आलेली नाही, हे विसरता येणार नाही़ महेंद्रसिंह धोनी याने आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कसोटीतून संन्यास घ्यायला हवा होता, असे मत भारताचे माजी दिग्गज फिरकी गोलंदाज इरापल्ली प्रसन्ना यांनी व्यक्त केले आहे़धोनीने अचानक कसोटीतून निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे़ या निर्णयाने मला धक्काच बसला़ आता त्याला पुढील जीवनासाठी माझ्याकडून विशेष शुभेच्छा़ - बिशनसिंग बेदीधोनीच्या शानदार कसोटी कारकिर्दीसाठी त्याचे अभिनंदऩ त्याला पुढील भविष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा़ - अनिल कुंबळेधोनीने एका योद्ध्याप्रमाणे देशाचे नेतृत्व केले आणि एखाद्या बहादूर व्यक्तीप्रमाणेच देशाच्या नेतृत्वावरून पायउतार झाला़ - सुरेश रैनाधोनीने कसोटीतून निवृत्ती घेतली याचे दु:ख आहे़ तो एवढ्या लवकर निवृत्ती घेईल, असे वाटले नव्हते़ - संजय मांजरेकरधोनी भाई तुझ्या शानदार कसोटी कारकिर्दीसाठी शुभेच्छा़ निश्चितच यापुढेही आम्हाला तुझी उणीव भासेल, यात शंका नाही़- आऱ विनयकुमारभारताच्या सर्वोत्कृष्ट फिनिशरपैकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनीला कसोटीतील विशेष योगदानासाठी शुभेच्छा़ - प्रज्ञान ओझाकसोटीत तुझ्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक शिखर पार केले़ वेलडन धोनी.- सकलेन मुश्ताक, माजी गोलंदाज, पाकिस्तानधोनीच्या खेळीचा मी चाहता होतो़ आता कसोटीत त्याचा खेळ बघता येणार नाही, याची खंत आहे़ - मायकल वॉन, माजी कर्णधार, इंग्लंडनव्या वर्षात भारतीय क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात होणार आहे़ धोनीच्या निर्णयाने आश्चर्य झाले; मात्र त्याचा निर्णय योग्यच आहे़ - रसेल अर्नोल्ड, श्रीलंकाधोनी मी तुझ्यासोबत खेळण्याचा प्रत्येक वेळी आनंद घेतला़ मित्रा आता २०१५चा वन-डे वर्ल्डकप देशाला जिंकून देणे हे तुझे पुढचे लक्ष्य असेल़ तुझ्याच नेतृत्वाखालील भारतीय संघाने अनेक शिखरे पार केली़ शाब्बास धोनी तुझ्या शानदार कसोटी कारकीर्दीसाठी.धोनीचा हा निर्णय सर्वांसाठी धक्कादायक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताला विदेशात विशेष कामगिरी करता येत नव्हती़ त्यामुळे त्याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केला जात होता़ यामुळेच त्याने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली असावी.
धोनीचा कसोटी क्रिकेटला अलविदा
By admin | Published: December 31, 2014 1:22 AM