भारतीय पुरुष हॉकी संघानं १९८०नंतर ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचा पराक्रम केला. भारतीय संघानं कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीवर ५-४ असा रोमहर्षक विजय मिळवला अन् भारताचा ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. भारताच्या या यशात गोलरक्षक पी आर श्रीजेश याचा सिंहाचा वाटा आहे. ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न घेऊन तो टीम इंडियाची सेवा करत होता अन् टोकियोत हे स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळे या पदकाचे मोल त्याच्या शिवाय कोणाला सहज समजणे शक्य नाही. ऑलिम्पिकमधील घवघवीत यशानंतर भारतीय खेळाडूंवर बक्षीसांचा वर्षाव होत आहे, त्याला हॉकी संघही अपवाद ठरलेला नाही. पण, पी आर श्रीजेशला बक्षीस म्हणून चक्क धोतर, शर्ट अन् १००० रुपये देण्याचा निर्णय झाला आणि चर्चेला विषय मिळाला.. ( A Dhoti and Shirt with a cash prize of Rs 1,000 ; the award for PR Sreejesh that has been announced )
ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं १९२८, १९३२, १९३६, १९४८, १९५२, १९५६, १९६४, १९८० मध्ये सुवर्णपद, १९६०मध्ये रौप्य आणि १९६८, १९७२, २०२१मध्ये कांस्य अशी एकूण १२ पदकं नावावर केली आहेत. बीसीसीआयनं पुरुष हॉकी संघाला १.२५ कोटींचं बक्षीस जाहीर केलं. पंजाब सरकारनं संघातील पंजाबच्या खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी जाहीर केले. असे असताना श्रीजेशला फक्त धोतर, शर्ट व १००० रुपयांचं बक्षीस देण्याचा निर्णयाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. केरळ सरकारच्या हातमाग विभागानं पी आर श्रीजेशचा असा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.