भारताचा 'गोल्डन बॉय' ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं एका नवा इतिहास रचला आहे. मानाची डायमंड ट्रॉफी जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. डायमंड लीगमध्ये भालाफेरीच्या पुरुष गटात २४ वर्षीय नीरजनं ८८.४४ मीटर दूरवर भालाफेक करत विजयाची नोंद केली.
नीरज चोप्रानं चेक प्रजासत्ताकचा याकूब वाडलेज आणि जर्मनीच्या जुलियन वैब्बर यांना पिछाडीवर टाकत डायमंड ट्राफीवर आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या फेरीत याकूब वाडलेज यानं ८४.१५ मीटर दूरवर भालाफेक करत नीरजला मागे टाकलं होतं. पण दुसऱ्या फेरीत नीरजनं दमदार कामगिरी करत ८८.४४ मीटर दूरवर भालाफेक केली. हीच कामगिरी कायम ठेवत तिसऱ्या फेरीत नीरजनं ८८ मीटर, चौथ्या फेरीत ८६.११ मीटर, पाचव्या फेरीत ८७ मीटर, सहाव्या आणि अंतिम फेरीत ८३.६० मीटर अंतरावर भालाफेक करत विजय प्राप्त केला. ८६.९४ मीटर अंतरावर भालाफेक करत वाडलेज याने दुसरा क्रमांक पटकावला. स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये ही डायमंड लीग स्पर्धा पार पडली.
नीरजने गेल्या वर्षी पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई करत इतिहास रचला होता. त्याआधी २०१८ मधील आशिया स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही नीरजने सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०२२ जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरजने रौप्य पदक मिळवलं होतं. यानंतर डायमंड लीग जिंकण्याची इच्छा नीरजनं बोलून दाखवली होती. अखेर नीरजनं त्याचं स्वप्न पूर्ण करुन दाखवलं आहे.