मी प्रो कुस्ती लीगमध्ये पहिल्यांदा खेळले तेव्हा मी ज्युनियर कुस्तीपटू होते. आणि तो पहिला सिझन होता आणि त्या सत्रात मी २०१३ ची विश्वविजेती अॅलिसा लाम्प हिला पराभूत केले. तुम्ही विचार करू शकता, त्या विजयाने माझा आत्मविश्वास आणि नैतिक बळ किती वाढले असेल.त्या दिवशी माझ्यामध्ये एक नवा विश्वास निर्माण झाला, की मी जगातील कोणत्याही कुस्तीपटूपेक्षा कमी नाही. प्रो कुस्ती लीग ही अशीच आहे. यातून नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळते. तसेच खेळातील सर्वोत्तम गोष्टी शिकण्याची संधीदेखील मिळते.या सत्रात माझा संघ वीर मराठा सर्वात संतुलित संघ म्हणून ओळखला जातो. मात्र दुर्दैवाने आम्हाला अजून नशिबाची साथ मिळालेली नाही. अखेरच्या क्षणी परवीन राणा आणि श्रवण यांचा झालेला पराभव हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे आम्ही दोन लढती गमावल्या.आम्ही दोन लढतीत नाणेफेक गमावली. आमच्या पराभवाचे हेदेखील एक कारण सांगितले जाते. पण मला विश्वास आहे, की आमच्यासोबत नेहमीच असे होणार नाही.आमचे नशीब लवकरच पालटेल. मला खात्री आहे, की आम्ही लवकरच आमच्या प्रतिभेप्रमाणे अपेक्षित निकाल मिळवू. मी माझ्या फ्रँचायझींना खात्री देते, की लवकरच आमचे चाहते वाढतील आणि आम्ही नक्कीच उपांत्य फेरीत जागा मिळवू.माझ्या खेळाप्रमाणे, मी निर्मलापेक्षा नक्कीच चांगले निकाल मिळवले आहेत. पण त्यासोबतच मी मान्य करते की मला अपेक्षित प्रतिस्पर्धी मिळाले नाही. माझी लढतचीनच्या सुन याहान हिच्यासोबत झाली नाही. आम्ही तिच्याविरोधात नेहमीच ब्लॉक कार्ड वापरतो.मी गेल्या काही महिन्यांपासून खडतर असा सराव केला आहे. त्यामुळे मला आशा आहे की, मला स्वत:ला तपासण्यासाठी सुन याहानविरोधात लढण्याची संधी मिळेल. मी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येदेखील चांगला खेळ केला आहे.नेहमीप्रमाणे मी यूपी दंगलच्या विनेश विरोधातील लढतीवर लक्ष ठेवून आहे. त्या लढतीत जो कोणी जिंकेल किंवा पराभूत होईल ते वजन ठरवेल.विनेश हिने तिचे वजन ५५ किलोंवरून ४९ किलोपर्यंत कमी केले आहे. मी ४९ ते ५० किलोच्या आसपास आहे. हा किंचितसा फरक माझ्यासाठी कठीण असेल.मला लोकमत मुंबई महारथी संघाच्या सीमाकडून कडवी लढत अपेक्षित आहे. मी या आधी तिचा सामना राष्ट्रकुल स्पर्धेच्या निवड चाचणीत केला आहे. सीमाचे वजन माझ्यापेक्षा जास्त आहे.मला वाटते, की मी दोन लढतीत पुनरागमन करून माझ्या संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवू शकते. ट्युनिशियाची आफ्रिकन विजेती मारवा आमरी हीमाझ्या संघाचा भाग आहे. ती ५७ किलो गटात खेळते. मी तिच्यासोबत दररोज सराव करत आहे. त्यामुळे मी दररोज स्वत:त चांगले बदल करत आहे.
विनेशविरोधात वजनातील फरक विजेता ठरवेल : रितू फोगाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 3:10 AM