ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 31 - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चेला माजी कर्णधार सुनील गावस्कर हे फारसे महत्त्व देत नाहीत. दोन पिढ्यांमधील फरकामुळे प्रत्येक संघात हे चित्र पाहायला मिळते, असे त्यांचे मत आहे.
सध्याचे कोच कुंबळे यांचा कार्यकाळ चॅम्पियन्स ट्रॉफी आटोपताच जूनमध्ये संपणार असल्याने, त्यांना मुदतवाढ न देता नव्या कोचसाठी बीसीसीआयने अर्ज मागितले. गावस्कर यांनी बोर्डाच्या या निर्णयाचे समर्थन केले. ते म्हणाले, ‘बीसीसीआय"ने जे केले ते माझ्या मते प्रक्रियेचे पालन आहे. कर्णधार आणि कोच यांचे एकमत असेल असे कुठल्याही देशात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. असे होणे शक्यदेखील नाही. कोच हा मागच्या पिढीसोबत खेळलेला असतो. त्याचा विचार सध्याच्या पिढीपेक्षा थोडा वेगळा असतो. मैदानावर हे चित्र पाहायला मिळत नसेलही, पण संघ संयोजन आणि आणि सराव सत्रादरम्यान हा फरक प्रामुख्याने जाणवतो. हा प्रकार गंभीरपणे घ्यावा, असे मला वाटत नाही. अशा प्रकारची चर्चा संघासाठी चांगलीच असते. कोच बनल्यापासून अनेक सामने जिंकून देणारे अनिल कुंबळे यांचे गावस्करांनी कौतुक केले. ते पुढे म्हणाले, ‘मी कुंबळेच्या यशाची चर्चा करेन. कुंबळेंनी संघाला यश मिळवून दिले आहे. भारतीय क्रिकेटच्या दीर्घ योजना आखणा-या व्यक्तीला कोच बनविण्यात यावे. भारतीय क्रिकेटचे ‘व्हिजन’जोपासणाºया व्यक्तीला या पदावर बसवावे, असे माझे स्पष्ट मत आहे.’