नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) न्या. आर. एन. लोढा यांच्या समितीने सुचविलेल्या शिफारशी लागू करण्यात अनेक अडचणी असल्याचे शपथपत्र बुधवारी सुप्रीम कोर्टात सादर केले.माजी सरन्यायाधीश लोढा यांच्या समितीने बीसीसीआयच्या कामकाजात आमूलाग्र बदलासाठी व्यापक शिफारशी दिल्या होत्या. बोर्डाने मात्र त्या लागू करण्यात अनेक अडचणी असल्याचे न्यायालयाला सांगून यासंदर्भात शपथपत्र सादर केले. बीसीसीआयचे वकील राधा रंगास्वामी यांनी हे शपथपत्र दाखल केले. मुख्य न्यायमूर्ती तीरथसिंग ठाकूर यांनी ४ फेब्रुवारी रोजी शिफारशींवर आपली बाजू मांडण्याचे बीसीसीआयला आदेश दिले होते. शिफारशींमुळे क्रिकेट व्यवस्थापनात विरोधाभासाची स्थिती उद्भवेल. बोर्डाच्या कामकाजावर विपरीत परिणाम करणाऱ्या या शिफारशी लागू करणे शक्य नसल्याचे बोर्डाचे मत आहे. लोढा समितीच्या शिफारशींमध्ये नोकरशाहा, राजकारणी आणि मंत्री यांना क्रिकेट प्रशासनापासून दूर ठेवण्यात आले आहे. बोर्डाने यावर आपल्या संलग्न राज्य संघटनांना मत मागितले होते. पंजाब क्रिकेट संघटनेने सोमवारी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली.
लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यात अडचणी
By admin | Published: March 03, 2016 4:08 AM